मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण संपवण्याचा सरकारचा डाव ;बसपा आक्रमक - State President of BSP Sandeep Tajne criticizes the government | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण संपवण्याचा सरकारचा डाव ;बसपा आक्रमक

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 जुलै 2021

आरक्षण नाकारून महापुरुषांच्या विचारांची पायमल्ली राज्य व केंद्र सरकार करत आहे

मुंबई : ''निवडणुकीच्या वेळेस हे सरकार फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या नावाने मत मागण्यास पुढे येते आणि निवडणूक झाल्यानंतर मागासवर्गीयांना OBC आरक्षण नाकारून याच महापुरुषांच्या विचारांची पायमल्ली राज्य व केंद्र सरकार करत आहे,'' असा आरोप बहुजन समाज पक्षाचे BSP प्रदेशाध्यक्ष ॲड. संदीप ताजणे Sandeep Tajne यांनी केला आहे. 

एससी-एसटी पदोन्नतीमध्ये आरक्षण व ओबीसींचे राजकीय आरक्षण बचावचा नारा देत आझाद मैदानात बहुजन समाज पक्षाच्या वतीने राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात राज्यभर धरणे आंदोलन पुकारण्यात आले. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदनही देण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मागासवर्गीयांना पदोन्नती प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी, राज्यात नोकरीतील ४.५ लाखांचा बॅकलॉग पूर्ण करावा, ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण त्वरित पूर्ववत करावे व मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसी समाजाची जनगणना करून संख्येनुसार आरक्षण बहाल करावे, महागाईमुळे जनसामान्य, गोरगरीब जनता बेहाल झालेली आहे. घरगुती गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिझेलच्या किमती व खाद्यतेलाचे भाव त्वरित कमी करावेत, अशा काही मागण्या पक्षातर्फे करण्यात आल्या.

एससी-एसटी यांच्या पदोन्नतीमध्ये आरक्षण तसेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. ''निवडणुकीच्या वेळेस हे सरकार फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या नावाने मत मागण्यास पुढे येते आणि निवडणूक झाल्यानंतर मागासवर्गीयांना आरक्षण नाकारून याच महापुरुषांच्या विचारांची पायमल्ली करत आहे,'' असा आरोप ॲड. संदीप ताजणे यांनी केला. मागासवर्गीय कर्मचारी व अधिकाऱ्यांना आयुष्यातून उठवण्याचे षड्‍यंत्र सरकारने केलेले आहे. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत या जातीयवादी सरकारला पायउतार केल्याशिवाय इथला बहुजन समाज गप्प बसणार नाही, असेही ताजणे म्हणाले. आगामी १० महापालिकांच्या निवडणुकीत बहुजन समाज पक्ष या मुद्द्यांना घेऊन समाजजागृती करण्याचा पूर्ण प्रयत्न करील व महापालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रस्थापितांना धूळ चारल्याशिवाय गप्प बसणार नाही, असेही ताजणे म्हणाले.
  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख