state govt gives option for final year students for examination | Sarkarnama

पदवीची अंतिम परीक्षा द्यायची तर द्या नाही तर देऊ ही नका : राज्य सरकारचा असाही निर्णय

सरकारनामा ब्यूरो 
शुक्रवार, 19 जून 2020

मुख्यमंत्री ठाकरे यांनी अंतिम वर्षाची परीक्षा न घेता आतापर्यंतच्या सत्राच्या गुणांची सरासरी काढून गुणदान केले जाईल असे जाहीर केले. या निर्णयाला राज्यपालांनी आक्षेप घेतल्यानंतर राज्य सरकारने विधी विभागाचे मत घेतले.

मुंबई : अंतिम वर्षाच्या परीक्षेवरून सुरू आलेल्या संभ्रमावर अखेर राज्य सरकारने पडदा टाकला आहे. अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थांना परीक्षेचा ऐच्छिक पर्याय देण्यात आला आहे. पदवी प्रमाणपत्र हवे असणाऱ्या विद्यार्थांना विद्यापीठांनी योग्य ते सूत्र वापरून निकाल घोषित करावा. तर ज्या विद्यार्थांना परीक्षा द्यायची आहे, त्यांच्या परीक्षेचा निर्णय विद्यापीठांनी घ्यावा, असा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी जाहीर केला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या देशव्यापी लॉकडाउनमुळे शैक्षणिक संस्था बंद आहेत. यामुळे पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षाही रखडल्या होत्या. या परीक्षा नेमक्या कशा घ्यायच्या याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. यानुसार राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या समितीने अंतिम वर्षाच्या परीक्षा जुलैमध्ये घेण्याचा निर्णय घेतला. मात्र यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी अंतिम वर्षाची परीक्षा न घेता आतापर्यंतच्या सत्राच्या गुणांची सरासरी काढून गुणदान केले जाईल असे जाहीर केले. या निर्णयाला राज्यपालांनी आक्षेप घेतल्यानंतर राज्य सरकारने विधी विभागाचे मत घेतले.

यानंतर गुरुवारी (ता. १८) राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. या बैठकीत विद्यपीठांच्या परीक्षांबाबत विषयांवर चर्चा झाली. त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाने परीक्षांबाबत अध्यादेश काढून हा निर्णय घेतला. अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या मागील सर्व सत्रात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थाना परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवे असल्यास तसे त्यांच्याकडून लेखी स्वरूपात घेऊन विद्यापीठानी योग्य ते सूत्र वापरून त्याचा निकाल जाहीर करावा. तर मागील सर्व सत्रात उत्तीर्ण झालेल्या अंतिम वर्षातील विद्यार्थाना परीक्षा द्यायची इच्छा असेल त्या विद्यार्थ्यांकडून लेखी घेऊन त्यांना परीक्षेस बसण्याची संधी देण्यात यावी, या परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून ठरवावे असा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबतही अव्यावसायिक परीक्षाप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला मान्यता देण्याचा प्रस्ताव संबंधित अभ्यासक्रमाच्या शिखर संस्थांकडे पाठविण्यात येणार असल्याचे, सामंत म्हणाले.

एटीकेटीच्या विद्यार्थ्यांचा निर्णय दोन दिवसात
ज्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा बॅकलॉग आहे. त्यांच्या बॅकलॉगच्या विषयांच्या परीक्षेसंदर्भात आणि एटीकेटी विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या प्रश्नावर राज्यातील विद्यपीठांचे कुलगुरू आणि मुख्यमंत्री यांची बैठक दोन दिवसात होणार आहे. या बैठकीत हा निर्णय घेण्यात येणार आहे

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख