भाजप-बॉलिवूड ड्रग्ज संबंधाचा तपास 'एनसीबी'ने न केल्यास राज्य सरकार करेल 

राष्ट्रीय तपास संस्थांनी चौकशी न केल्यामुळे राज्य पोलिसांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी कॉंग्रेसचे सचिन सावंत यांनी आज पुन्हा केली.
The state government will investigate the BJP-Bollywood drug case if the NCB does not investigate it
The state government will investigate the BJP-Bollywood drug case if the NCB does not investigate it

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या बॉलिवूड ड्रग्ज कनेक्‍शनसंदर्भातील पुरावे महाराष्ट्र सरकारतर्फे राष्ट्रीय तपास यंत्रणांना सोपवूनही त्यांनी यासंदर्भात चौकशी केली नाही. आताही त्यांनी चौकशी केली नाही, तर राज्य पोलिसांतर्फे ही चौकशी केली जाईल, अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (ता. 16 ऑक्‍टोबर) येथे कॉंग्रेस शिष्टमंडळाला दिली. 

या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थांनी चौकशी न केल्यामुळे राज्य पोलिसांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी कॉंग्रेसचे राज्य सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज पुन्हा त्यांच्याकडे केली. त्यावर गृहमंत्र्यांनी वरीलप्रमाणे हमी दिल्याचे सावंत यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. 

सावंत यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या शिष्टमंडळाने आज गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन या मागणीचे पत्र दिले. नार्कोटिक्‍स क्राईम ब्यूरोने (एनसीबी) आतापर्यंत यासंदर्भात केलेला तपास हा फार्स आहे, हे दिसून आले आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी सीबीआय व ईडी यांनी तपास करूनही त्यांना काहीही मिळाले नाही. पण, फक्त महाराष्ट्राची बदनामी केली गेली, असेही सावंत यांनी गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात दाखवून दिले. 

भाजप व बॉलिवूड ड्रग्ज संबंधांची चौकशी करण्याची मागणी सावंत यांनी यापूर्वी 1 ऑगस्ट रोजी गृहमंत्र्यांकडे केली होती. मात्र, सुशांतसिंह प्रकरणाचा तपास तीन राष्ट्रीय तपास यंत्रणा करीत असल्याने हे पुरावे सरकारतर्फे या तपास यंत्रणांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या माहितीनुसार "एनसीबी'ने अद्याप चौकशीच केली नाही. 

पण आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे या संदर्भात अभिनेता विवेक ओबेरॉय (नरेंद्र मोदींच्या बायोपिकमध्ये मोदींची भूमिका करणारा) याचे नाव घेतले जात आहे. बंगलोर पोलिसांनी गुरुवारी मुंबईत त्याच्या घरी येऊन तपास केला. तरीही तीन राष्ट्रीय तपास यंत्रणांना चौकशीसाठी वेळ मिळत नाही, हे आश्‍चर्यजनक आहे, असेही पत्रात सावंत यांनी म्हटले आहे. 

योगायोग म्हणजे लॉकडाउननंतर काल (ता. 15 ऑक्‍टोबर) देशभरात जो पहिला चित्रपट प्रदर्शित झाला, तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच बायोपिक होता. त्याच दिवशी या चित्रपटातील अभिनेता विवेक ओबेरॉय आणि सहनिर्माता या दोघांच्या घरी ड्रग्ज कनेक्‍शनसंदर्भात छापे पडावेत, हा नियतीने ठरवलेला योगायोग आहे का, असा टोलाही या पत्रात लगावण्यात आला आहे. 

Edited By vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com