अनिल देशमुखांच्या उत्तरावर सभापती रामराजेंचेही समाधान झाले नाही

वीजमाफी प्रश्नावरून आज विधान परिषदेतही गोंधळ झाल्याने कामकाज वीस मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते.
 Anil Deshmukh, Ramraje Naik Nimbalkar .jpg
Anil Deshmukh, Ramraje Naik Nimbalkar .jpg

मुंबई : वीजमाफी प्रश्नावरून आज विधान परिषदेतही गोंधळ झाल्याने कामकाज वीस मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते. दरम्यान, अंमली पदार्थ, हुक्का पार्लर आणि डान्स बार आढळणाऱ्या पोलिस ठाण्याच्या प्रमुखावर कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

वीजमाफीवरील चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर हल्लाबोल केला. वीजमाफी व सवलत सोडा, उलट अवाच्या सव्वा वीजबिले पाठवल्याचे सांगत त्यांनी दोन शेतकऱ्यांना लाखात आलेली वीजबिले सभागृहात फडकावली. बिल्डरांना सात-आठ हजार कोटी रुपयांचा प्रीमियम देणारे व दारुवरील शुल्क माफ करणारे सरकार शेतकऱ्यांना, मात्र वीजबिलमाफी देत नसल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. त्यासाठी कर्ज घ्या, पण माफी द्या, असे ते म्हणाले. 

नोटीस दिल्याशिवाय वीजजोड न तोडण्याची व वीजबिले दुरुस्त करण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत सभागृहात नव्हते. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या वक्तव्याची नोंद घेतलीय एवढेच उत्तर दिले. त्यामुळे विरोधक, तर संतप्त झालेच शिवाय सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनाही ते उत्तर समाधानकारक वाटले  नाही. त्यामुळे मंत्र्यांना बोलावून उत्तर द्या, असे सभापतींनी फर्मावले. 

दरम्यान, विरोधकांचा गोंधळ सुरुच राहिल्याने सभापतींनी कामकाज वीस मिनिटांसाठी तहकूब केले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री सभागृहात आले. त्यांच्या उत्तराने विरोधकांचे समाधान झाल्याने प्रश्नोत्तराचा पुढील तास सुरळीत पार पडला.

ठाणे व पालघर जिल्ह्यात व त्यातही महाविद्यालयाजवळ विक्री होत असलेले अंमली पदार्थ तसेच सुरु असलेले हुक्का पार्लर आणि डान्सबारवर प्रश्नोत्तराच्या तासात गरमागरम चर्चा झाली. त्यात विरोधी पक्षनेत्यांनी वरळीत सुरु असलेल्या पबचाही मुद्दा उपस्थित केला. तेथील वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला निलंबित करण्याची मागणी केली. मात्र, चौकशीची संधी न देता निलंबन केले, तर हेतू साध्य होत नाही, असे सांगत सभापतींनी अप्रत्यक्षपणे त्यांची मागणी अमान्य केली. 

याप्रकरणी चौकशी सुरु केली असून त्याचा अहवाल आल्यानंतर कारवाई करू, असे उत्तर गृहमंत्र्यांनी दिले. मात्र, त्याने दरेकर व सभापती दोघांचेही समाधान झाले नाही. त्यामुळे दोन दिवसांत कारवाई करा, असा आदेश सभापतींना द्यावा लागला. दहिसर, काशिमिरा येथे डान्सबार सुरु असून त्याचे हफ्ते वरपर्यंत जात असल्याचे दरेकरांनी सांगितले. तर, इथे चर्चा झाली की तेवढ्यापुरती कारवाई होऊन हे अवैध धंदे बंद होतात. 

त्यामुळे अवैध धंदे आढळणाऱ्या पोलिस ठाण्याच्या प्रमुखाला त्याबाबत जबाबदार धरून कारवाई करण्याची मागणी भाई जगताप यांनी केली. ती गृहमंत्र्यांनी मान्य केली. तसेच हा ठाणे व पालघर येथीलच प्रश्न नसून तो राज्यालाही भेडसावत असल्याने त्याप्रकरणी कडक कारवाईचे आदेश पोलिसांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. 

Edited By - Amol Jaybhaye  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com