भाजपची ही चाल आहे; पण तुमचे हात देखील बरबटलेले असण्याची शक्यता!

ईडीने पाठवलेल्या समन्समध्ये वैयक्तिक उपस्थित राहावे लागेल, असे स्पष्ट केलेल नाही, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.
 Anil Deshmukh .jpg
Anil Deshmukh .jpg

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मंगळवारी चौकशीसाठी हजर राण्यासाठी ईडीने समन्स पाठवले होते. मात्र, प्रत्यक्ष चौकशीऐवजी ऑनलाईन जबाब देण्याची तयारी देशमुखांनी दाखवली आहे. तसे पत्र त्यांनी ईडीला पाठवले आहे. कोरोनामुळे त्यांनी ऑनलाईन आपला जबाब नोंदवणार असल्याचे सांगितले आहे, त्यावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया  (Anjali Damania) यांनी टीका केली आहे.  (Social activist Anjali Damania criticizes Anil Deshmukh)  

दमानिया यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे. त्यामध्ये त्या म्हणाल्या की, ''आता अनिल देशमुखांना कोरोना आठवतो? पैसे खाल्ले तेव्हा नव्हता कोरोना? ED ने बिलकुल अपवाद करू नये. Law should be same for everyone. उद्या सगळेच म्हणतील आम्ही घरून उत्तर देऊ. मग काय अर्थ यंत्रणेचा? बीजेपी ची ही चाल आहे,  पण तुमचे  हात देखील बरबटलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही'', असे दमानीया यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मंगळवारी ईडीला लिहिलेल्या पत्रात अनिल देशमुख यांनी म्हटले आहे की, ''मी जवळपास ७२ वर्षांचा आहे, उच्च रक्तदाब आणि हृदयासंदर्भातील विविध प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त आहे. तपास करताना आणि जबाब नोंदवताना मी  २५ तास आपल्याशी संवाद साधला आहे. म्हणूनच, आज स्वत: उपस्थित राहणे योग्य नाही. मी माझा अधिकृत प्रतिनिधी पाठवत असल्याचे म्हटले आहे. 

ईडीने त्याच्यांसंदर्भात दाखल केलेल्या अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवालाची (ईसीआयआर) प्रत दिल्यानंतर त्यांनी मागितलेली सर्व माहिती आणि कागदपत्रे सादर करणार असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. ईडीने पाठवलेल्या समन्समध्ये वैयक्तिक उपस्थित राहावे लागेल, असे  स्पष्ट केलेल नाही, असेही देशमुख यांनी म्हटले आहे. 

देशमुख यांना ईडीने समन्स पाठवून पुन्हा आज चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यामुळे देशमुख मंगळवारी ईडी कार्यालयात उपस्थित राहतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यापूर्वी शनिवारी (ता. २६ जून) देशमुख यांना चौकशीसाठी ईडीने हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, चौकशीचे मुद्दे कळल्यानंतरच उत्तरे देता येतील, अशी भूमिका घेत देशमुखांनी एकप्रकारे ईडीवर कुरघोडी केली होती. 

देशमुख यांच्या वकिलाने शनिवारी (ता. २६ जून) अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई टळली होती. त्यानंतर आज (ता. २८ जून) पुन्हा ईडीने समन्स पाठवून मंगळवारी चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

देशमुख यांच्या नागपूर येथील श्री साई शिक्षण संस्थेच्या खात्यावर चार कोटी १८ लाख रुपये जमा झाले होते. ते दिल्लीतील चार कंपन्यांमार्फत जमा झाले होते. या कंपन्या फक्त कागदोपत्री असून पैसे हस्तांतरणासाठी त्याचा वापर होतोय, असे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले. या कंपनीचे मालक असलेल्या जैन बंधूंचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याने एका व्यक्तीला ही रक्कम पाठवून ट्रस्टमध्ये भरण्यास सांगितल्याचा ईडीचा दावा आहे. बारमालकांकडून घेतलेली ४ कोटी ७० लाखांची रक्कम ती हीच असल्याचा ईडीला संशय असून देशमुख यांच्यामार्फत त्यांच्या मुलाकडे व तेथून हवालामार्फत दिल्लीतील कंपनी व पुढे देशमुख यांच्या शिक्षण संस्थेत जमा झाल्याचा ईडीचा दावा आहे.

मनी लाँडरिंगप्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात तक्रार करणारे ॲड. तरुण परमार यांचा जबाब सोमवारी (ता. २८ जून) ईडीने नोंदवला. या वेळी त्यांनी काही कागदपत्रेही ईडी कार्यालयात सादर केली. या प्रकरणी ईडीने पुन्हा बोलवल्यास आपण उपस्थित राहून यंत्रणेला सहकार्य करू, असे परमार यांनी सांगितले आहे. 

Edited By - Amol Jaybhaye
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com