'शेकाप' नगरसेवकाचा भाजप नगरसेवकाच्या घरासमोर गोळीबार... - Shooting in front of BJP corporator house Prashant Kothavale Tukaram Sable | Politics Marathi News - Sarkarnama

'शेकाप' नगरसेवकाचा भाजप नगरसेवकाच्या घरासमोर गोळीबार...

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 16 मार्च 2021

नगरसेवक प्रशांत कोठावळे पसार झाले आहेत.

खोपोली : किरकोळ कारणावरून 'शेकाप'च्या एका नगरसेवकाने भाजप नगरसेवकाच्या घरासमोर रात्री दीड वाजता हवेत गोळीबार केल्याने खोपोली शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खोपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेकापच्या फरार नगरसेवकाचा पोलिस शोध घेत आहेत. या घटनेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

खोपोली नगरपालिकेतील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक तुकाराम साबळे, 'शेकाप'चे नगरसेवक प्रशांत कोठावळे आणि अन्य काही जण शिवसेनेचे नगरसेवक राजू गायकवाड यांच्या पुतण्याच्या हळदी समारंभाला गेले होते. त्याठिकाणी नगरसेवक प्रशांत कोठावळे आणि अन्य एकाचा किरकोळ वाद झाला. हळदी समारंभातून सर्व शिळफाटा येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी आले.त्यावेळीही पुन्हा वाद झाल्याने नगरसेवक तुकाराम साबळे यांनी मध्यस्थी करत नगरसेवक प्रशांत कोठावळे यांना समज दिल्याचा राग मनात ठेवून प्रशांत कोठावळे यांनी रात्री दीड वाजता अन्य दोन सहकार्‍यांसह तुकाराम साबळे यांच्या घरासमोर जावून त्यांना घराबाहेर बोलावत शिवीगाळ करत असताना अनेक जण जमा झाल्याचे पाहून कोठावळे यांनी हवेत गोळीबार केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

रात्री दीड वाजता हा सर्व प्रकार घडत असताना गस्तीवर असलेले पोलिस घटनास्थळी पोहोचले होते. मात्र पोलिस आल्याचे पाहून नगरसेवक प्रशांत कोठावळे आणि त्याचे दोन सहकारी पळून गेले. पोलिसांना घटनास्थळी पिस्तूल मधून हवेत गोळीबार केलेली रिकामी पुंगळी सापडली आहे. भाजपचे नगरसेवक तुकाराम साबळे यांनी या प्रकरणी खोपोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करत खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, खोपोली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश आस्वर या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहरांच्या मध्यवर्ती असूनही खोपोली शहराची ओळख शांत शहर अशी आहे. इथे केवळ निवडणुकीपुरतेच राजकारण केले जाते. निवडणुकीनंतर सर्व पक्ष, नेते आणि कार्यकर्ते एकत्रच असतात. गुन्हेगारीपासूनही खोपोली शहर दूरच आहे. अशा वेळी किरकोळ कारणावरून एक लोकप्रतिनिधी दुसर्‍या लोकप्रतिंनिधीच्या जिवावर उठून रात्री घरासमोर जावून हवेतगोळीबार करत असेल तर ही बाब निश्चितच गंभीर असून या घटनेने खोपोली शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होईल, अशी कुणकुण लागल्याने नगरसेवक प्रशांत कोठावळे पसार झाले आहेत.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख