मुंबई निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा.. विरोधकांकडे मी पाहतो : ठाकरेंचा शिवसैनिकांना आदेश - Shivsena strats preparation for BMC election and thackeray gives instructions to party workers | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबई निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा.. विरोधकांकडे मी पाहतो : ठाकरेंचा शिवसैनिकांना आदेश

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबई पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोनाच्या कार्यकाळात केलेल्या कामाचा आढावा वर्षा बंगल्यावर  घेतला.

मुंबई : शिवसेनेला मुंबईबद्दल शिकवणारे अनेक जण आले अन्‌ गेले; पण मुंबई आमचीच आहे आणि राहील, असे उद्‌गार आज परिवहनमंत्री अनिल परब यांनी काढले. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई सावरण्यासाठी भाजप समोर येत असल्याची घोषणा बुधवारी कार्यकारिणी बैठकीत करताच शिवसेनेनेही आता आपली तयारी सुरू केली आहे. त्यात अनिल परब यांनी भाजप नेत्यांना दिले. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनीही शिवसैनिकांना सज्ज राहण्याचे आदेश दिले.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर मुंबई महापालिका निवडणुकीची आज खलबते झाली. पहिल्या टप्प्यात दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा निवडणूक मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली.  यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोनाच्या कार्यकाळात केलेल्या कामाचा आढावा पदाधिकाऱ्यांकडून घेतला. लोकसभा दादर मध्य मतदारसंघातील विभागप्रमुख सदा सरणकर, विभागप्रमुख मंगेश सातमकर, महिला आणि स्थापत्य समितीच्या अध्यक्षा श्रद्धा जाधव या वेळी उपस्थित होते.

स्वतःची काळजी घेत जनतेची कामे करा. महापालिका निवडणुकिसाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे. त्यासाठी आतापासून कामाला लागा. आपण कुठे कमी पडलो हे पाहा आणि अधिक जोमाने कामाला लागा, विरोधक काय बोलतायत त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्ही तयारीला लागा. त्यांचा समाचार घेण्यास आम्ही सक्षम आहोत, असा आदेश ठाकरे यांनी या बैठकीत दिल्याचे सांगण्यात आले.

या बैठकीबाबत प्रकाश फातर्फेकर यांनी सांगितले की कोरोना काळात शिवसैनिकांनी केलेल्या कामाचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी कौतुक केल्याने कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढल आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख