विरोधी पक्षाने 1 मेपर्यंत घरीच बसावे... शिवसेनेचा भाजपला सल्ला    - shivsena saamana editorial corona haridwar kumb mela  | Politics Marathi News - Sarkarnama

विरोधी पक्षाने 1 मेपर्यंत घरीच बसावे... शिवसेनेचा भाजपला सल्ला   

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 एप्रिल 2021

लोकांनी मुख्यमंत्र्यांचे ऐकले आहे. विरोधी पक्षाने 1 मेपर्यंत घरीच बसावे,'' असा सल्ला शिवसेनेने  भाजपला दिला आहे.

मुंबई : ''मुख्यमंत्री ठाकरे यांनी लॉकडाउन केले तर लोक रस्त्यावर उतरतील असे विरोधी पक्ष ओरडत होता. तसे काहीच घडताना दिसत नाही. लोकांनी मुख्यमंत्र्यांचे ऐकले आहे. विरोधी पक्षाने 1 मेपर्यंत घरीच बसावे,'' असा सल्ला शिवसेनेने दिला आहे.

सामनाच्या अग्रलेखात आज कोरोना, महाराष्ट्रातील लॅाकडाउन, विरोधीपक्षांची भूमिका यावर भाष्य केले आहे. हरिद्वारच्या कुंभमेळयाने करोनाचा अणुबॉम्बच फोडला. कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या शेकडो साधू-संत आणि गंगेत डुबकी मारणाऱ्या पवित्र आत्म्यांना कोरोना झाला आहे. आता हे लोण पसरत जाईल असं सामना संपादकीयमधून म्हटलं आहे. देशभरात कोरोना धुमाकूळ घालीत असताना धर्म, सण, उत्सव यावर नियंत्रण ठेवावेच लागेल असं मत शिवसेनेने व्यक्त केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पंधरा दिवसांसाठी कडक निर्बंधांची घोषणा केली आहे. 1 मेच्या सकाळपर्यंत राज्यात संचारबंदी म्हणजे 144 कलम लागू करून करोनाविरुद्धच्या दुसऱ्या लढाईचे रणशिंग फुंकले आहे. कडक निर्बंध म्हणजे एकप्रकारे लॉकडाउनच आहे, पण मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंगळवारी रात्री जनतेला विश्वासात घेऊन या लॉकडाउनची घोषणा केली. त्याआधी सात-आठ दिवस सरकार लॉकडाउनसंदर्भात जनतेची मानसिकता तयार करीत होते. सरकारच्या मनात आले म्हणून मागचा पुढचा विचार न करता लॉकडाउन लादले असे केले नाही,  असा टोला शिवसेनेने भाजपला  लगावला आहे.

 कोरोनासंदर्भातली आणीबाणी फक्त महाराष्ट्रातच उद्भवली आहे काय? संपूर्ण देशच कोरोनाच्या जबडय़ात अडकला आहे. महाराष्ट्र लपवाछपवी करून रुग्णांचा आकडा लपवत नाही. कारण खोटेपणा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला नाही.
 

''झारखंड, छत्तीसगढ येथील सरकारी रुग्णालयांत मृतांचा खच पडला आहे. उत्तर प्रदेश, झारखंड, गुजरात या राज्यांत उच्च न्यायालयास हस्तक्षेप करून ‘लॉकडाउन करा’ असे सांगावे लागत आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्राने घेतले तसे इतर राज्यांनी कोरोनाचे प्रकरण गांभीर्याने घेतलेले दिसत नाही,'' अशी टीका अग्रलेखात करण्यात आली आहे.  

''करोनाचा विषाणू भगवा किंवा हिरवा अशा कोणत्याच रंगाची आणि धर्माची पर्वा करीत नाही. हा विषाणू अमानुष आहे व कुणालाच सोडत नाही. सध्याच्या संकटाच्या स्थितीत लोकांनी शिस्त पाळायलाच हवी, पण शिस्त फक्त मरकजवाल्यांनी किंवा रमजानवाल्यांनीच पाळावी, चर्च किंवा गुरुद्वारांनी पाळावी या मानसिकतेतून आता बाहेर पडले पाहिजे. ही लढाई मानवता आणि देश वाचविण्यासाठी आहे,'' असं अग्रलेखात म्हटलं आहे.

''करोनातून जगवण्यासाठी लॉकडाउन लादायचे व लॉकडाउन काळात लोकांना भूक, बेरोजगारीने मारायचे या चक्रातून महाराष्ट्र सरकारने लोकांना बाहेर काढले आहे. कुंभमेळा, मरकज, रमजान यावर कोरोनाचेच गिधाड फडफडत आहे. लोक गांभीर्याने घेत नाहीत तेव्हा सरकारला गांभीर्याने घ्यावे लागते. गुजरातमध्ये स्मशानात मृतदेहांचीच चेंगराचेंगरी सुरू आहे. चिता इतक्या पेटत आहेत की, स्मशानात लाकडे कमी पडली व सरणावरील लोखंडी शिगाच वितळू लागल्या. महाराष्ट्राला यापासून धडा घ्यावाच लागेल,'' असंही शिवसेनेने म्हटलं आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख