shivsena mp sanjay raut wish happy birthday to udhhav thackrey | Sarkarnama

संजय राऊत उद्धव ठाकरेंना म्हणाले, ही दोस्ती तोडणार नाही!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 27 जुलै 2020

उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून पहिला वाढदिवस असताना राऊत यांनी मैत्री तोडण्यासंदर्भातील चर्चा करण्याचे औचित्य ते काय, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.

पुणे: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मिडीयावरून त्यांचे अभिष्टचिंतन सुरू असताना राजकीय नेत्यांनी टोलेबाजी सुरू केली आहे. उद्धव ठाकरेंचे विश्वासू मानले जाणारे सेना नेते, खासदार संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे आपल्या शैलित ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत.

दोन दिवसांपुर्वी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीत राज्य सरकारचे स्टेअरिंग माझ्याच हातात असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्याला प्रत्युत्तरादाखल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बोचरी टीका केली आहे. राज्यात तीन मुख्यमंत्री काम करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापार्श्वभुमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे ट्विट केले आहे. त्यातील फोटो पाहता सरकारमधील आर्तंविरोध स्पष्टपणे दिसून येत आहे. उद्धव ठाकरेंनी सामनाच्या मुलाखतीत स्टेअरिंग माझ्यात हातात असल्याचे सांगितले होते, मात्र आज अजित पवारांच्या ट्विटमध्ये त्यांच्या स्वत:च्या हाती स्टेअरिंग असल्याचा आणि उद्धव ठाकरे शेजारी बसले असल्याचा फोटो वापरण्यात आला आहे. ट्विटमधील शुभेच्छांपेक्षा त्या फोटोचे राजकीय विश्लेषण अधिक होत आहे. आपणच सरकार चालवत आहोत, असा दावा अजित पवारांनी केल्याचे मानले जात आहे.

या चर्चा सुरू असताना संजय राऊत यांचे ट्विट पुढे आले आहे. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री बनवण्यात बजावलेली भुमिका आणि त्या दोघांमध्ये असलेले उत्तम संबंधाची महाराष्ट्रातील माहिती आहे. मात्र त्यांनी आज उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना '' ये दोस्ती...हम नही तोडेंगे'' असे ट्विट केले आहे. उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून पहिला वाढदिवस असताना राऊत यांनी मैत्री तोडण्यासंदर्भातील चर्चा करण्याचे औचित्य ते काय, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. सामनाचे कार्यकारी संपादक ही संजय राऊत यांची मूळ ओळख. पुढे ते शिवसेना नेते बनले. राज्यसभेचे खासदार बनले. आता ते शिवसेनेत ठाकरे कुटंबियांव्यतिरिक्त सर्वांत ताकतवर व्यक्ती आहेत. असे असताना त्यांनी 'मैत्री तोडणार नाही' असे जाहीर केले आहे. त्यामुळे सद्या उद्धव ठाकरे- संजय राऊत यांच्यात वादंग आहे का, असा एखादा विषय झाला आहे का की त्यातून मैत्री तुटेल, यासंबंधाने आता अर्थ काढले जात आहेत.

संजय राऊत यांनी भाजपला महाराष्ट्राच्या सत्तेपासून रोखण्यात तसेच उद्धव ठाकरे यांचे सरकार आणण्यात महत्वाची भुमिका बजावली. त्यानंतर सत्तेत संजय राऊत यांच्या आमदार भावाला मंत्री केले जाईल, असे वातावरण होते. मात्र ऐेनवेळी ते नाव कापण्यात आले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर संजय राऊत यांना सामनाचे संपादक करण्यात आले, मात्र संपादक ठाकरेच पाहिजे असे सांगून संजय राऊत यांचे पद काढण्यात आले. त्यांच्याजागी रश्मी ठाकरे संपादक झाल्या. या ताज्या घटना गेल्या काही दिवसांतील आहेत. तसेच संजय राऊत यांचे महत्व कमी करण्यासाठी शिवसेनेतील एक गट कार्यरत आहे. यासंदर्भानेही दोस्ती तोडण्यासंदर्भातील चर्चा राऊत यांनी सुरू केली असावी, असे मानले जात आहे.

Edited by swarup jankar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख