आमच्यात सांगायची हिंमत आहे; व्यंकय्या नायडू बरोबर वागले : संजय राऊत - shivsena mp sanjay raut on udyanraje oath controversy | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
सरपंचपदाचे आरक्षण नव्यानेच होणार आणि प्रशासकांच्या कारभाराची चौकशीही होणार

आमच्यात सांगायची हिंमत आहे; व्यंकय्या नायडू बरोबर वागले : संजय राऊत

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 23 जुलै 2020

'जय शिवाजी' ही घोषणा 'जय हिंद' 'वंदे मातरम' एवढीच महत्वाची आहे.

मुंबई: खासदार उदयनराजे भोसले यांच्या राज्यसभेतील शपथग्रहणावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला की नाही, याची जोरदार चर्चा सुरू असताना शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू हे त्यांच्याजागी बरोबर असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्रातील नवनिर्वाचित खासदारांचा काल राज्यसभेत शपथविधी झाला. ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रिय मंत्री रामदास आठवले, उदयनराजे भोसले, राजीव सातव आदींनी काल राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू यांच्याकडून शपथ घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले उदयनराजे यांनी इंग्रजी भाषेतून शपथ घेतली. मूळ नमुन्यातील शपथ संपल्यानंतर त्यांनी 'जय महाराष्ट्र जय हिंद जय भवानी जय शिवाजी' असा घोष केला. त्यानंतर सभापती नायडू यांनी 'हे हाऊस नाही तर ते माझे चेंबर आहे. बाकीचे शब्द अभिलेखावर जाणार नाहीत' असे स्पष्ट करत ते (उदयनराजे) नवीन सदस्य आहेत, अशी टिप्पण्णी केली. या घटनाक्रमत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्याचा आरोप महाराष्ट्रातील अनेकांनी केलेला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीवर असून त्यांच्याकडून भाजपवर टीका सुरू आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात ट्विट करून तिरकस भाष्य केले आहे. ' छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? याविषयावर भाजपने तोंड बंद आंदोलन सुरू केले आहे' असे म्हणत राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मात्र स्वत: उदयनराजे भाजपच्या बचावासाठी पुढे आले आहेत. संसदेत शिवाजी महाराजांच्या अवमानाचा विषय आलाच नाही. तसे काही झाले तर मी तिथेच राजीनामा दिला असता, असे उदयनराजेंनी जाहीर केले आहे.

उदयनराजेंची दिल्लीतील ही पत्रकार परिषद संजय राऊतांनी टिव्हीवर बघितली. त्यानंतर लगेचच पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, उदयनराजेंचा संवाद ऐकणे हा आनंद असतो. ते अत्यंत मोकळेपणाने बोलत असतात. मी त्यांच्या भावनांशी सहमत आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने कोणीही राजकारण करू नये. महाराजांचा अपमान कोणी सहन करू नये. शिवाजी महाराजांचा अपमान केला तर महाराष्ट्र गप्प बसणार नाही. हेच मत उदयनराजेंनी मांडले आहे. त्यात काही चुकीचे नाही.

'जय भवानी जय शिवाजी' ही घोषणा घटनाबाह्य नाही. लोकसभेत आणि राज्यसभेत महाराष्ट्राच्या खासदारांनी अनेकदा आंदोलने केली आहेत, त्यावेळी या घोषणा दिलेल्या आहेत. व्यंकय्या नायडू हे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती आहेत. ते नियमांचे काटेकोर पालन करणारे नेते आहेत. त्यांच्यादृष्टीने ते बरोबर आहेत. व्यंकय्या नायडू हे नियमाने वागले, हे मी सांगतो आहे. आमच्यात सांगायची हिंमत आहे. त्यांच्याइतका संसदीय कामकाजाचा अनुभव असणारा नेता आम्ही पाहिला नाही. आम्ही सर्वजण त्यांचे ऐकतो, असेही राऊत म्हणाले. 

Edited by swarup jankar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख