धक्कादायक : राऊत म्हणाले, "शरद पवार आणि माझेही फोन टँप होत होते..."  - ShivSena MP Sanjay Raut in phone tapping case Sharad Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक : राऊत म्हणाले, "शरद पवार आणि माझेही फोन टँप होत होते..." 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 26 मार्च 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माझेही फोन टँप होत होते," असे संजय राऊत यांनी सांगितले. 

मुंबई : पोलिस अधिकारी, राजकीय व्यक्ती यांचे फोन टॅपिंग प्रकरण राज्यात सध्या गाजत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फोन टॅपिंग संदर्भांत पत्रकार परिषदेत आज आणखी एक खुलासा केला आहे. "सरकारला अंधारात ठेवून काही अधिकाऱ्याचे फोन टँपिंग होत होते हे आता उघड झाले आहे. अधिकारी, राजकीय व्यक्ती, पत्रकारांचेही फोन टॅपिग होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माझेही फोन टँप होत होते," असे राऊत यांनी सांगितले. 

संजय राऊत म्हणाले, "राज्यात ठाकरे सरकार येऊ नये, म्हणून आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी अनेक आमदारांना धमक्या दिल्या. एवढे फोन टॅप होऊनही सरकार सत्तेत आलं. केंद्रातील युपीए सरकार मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचे आहे. राजकीय व्यक्तींनी अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवू नये. यूपीएचे नेतृत्व सोनिया गांधी यांनी उत्तम केलं. केंद्रातील काही नेते युपीए दोन स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. युपीए दोन स्थापन करण्यापेक्षा युपीए एक कसे मजबूत होईल, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी याचा अभ्यास करणं गरजेचे आहे."

रश्मी शुक्ला रडत म्हणाल्या होत्या..."मला माफ करा.."
 
राष्ट्रवादी कॅाग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काल ट्विट करीत आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप केला आहे. शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता भाजपा बरोबर राहावे, यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली होती. रश्मी शुक्ला यांनी त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला होता. रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्यासाठी आणखी काय पुरावे हवे आहेत, असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी काल पत्रकार परिषद घेऊन रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रश्मी शुक्ला यांच्यावर टीका करताना जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र सरकार शिवाजी महाराजांची शिकवण विसरलं, असं म्हटलं आहे. 

"सरकारकडून आपण खूप मोठ्या ह्रदयाचे आहोत, हे दाखवण्याची चूक झाली. शिवाजी महाराजांचं तत्व होतं, ते चूक झाल्यावर माफी नाही, ही शिकवण राज्य सरकार विसरलं होतं", असं ते म्हणाले. "सगळ्या चुका करून जर रश्मी शुक्ला रडत मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुख्य सचिव गृहसचिव यांच्याकडे गेल्या आणि मला माफ करा म्हणाल्या. माझे पती नुकतेच वारले आहेत असं म्हणाल्या, तर कोणत्याही व्यक्तीला पाझर फुटतोच. पण हा मोठ्या कटाचा भाग आहे, हे लक्षातच आलं नाही”, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

2019च्या निवडणुकीत शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांच्यावर रश्मी शुक्ला यांनी दबाब आणून भाजपला पाठिंबा देण्यासाठी प्रयत्न केला होता, असा आरोप काल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आपल्या टि्वटमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणतात, "शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडी मध्ये न जाता भाजपा बरोबर राहावं यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली, त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखिल प्रयत्न केला होता.अजून पुरावे काय पाहिजेत."

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख