shivsena mp arvind samant criticizes vjp leaders in ssr case | Sarkarnama

बिहारचे पोलीस भाजप नेत्यांच्या बीएमडब्ल्यू, जग्वार गाडीतून मुंबईत फिरले!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

कालपर्यंत भाजपच सत्तेवर असताना हेच पोलीस त्यांच्या ताब्यात होते आता याच पोलिसांवर भाजपनेते आरोप करत आहेत हे निंदनीय आहे.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी तपास करण्यासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस येथील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या गाडीतून फिरले, असा आरोप शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.

याप्रकरणी भाजप नेत्यांनी काल राज्य सरकारमधील एका तरुण मंत्र्याला लक्ष्य केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना सावंत यांनी, याप्रकरणी भाजपा नेत्यांकडे पुरावे असतील तर ते सरकारला द्यावेत. तसेच आरोप करताना नाव घ्यावे, अशीही मागणी केली.

राज्य मंत्रिमंडळातील युवा नेत्याला प्रसार माध्यमांचा वापर करून बदनाम करण्याचा कट केला जात आहे. त्यांची राजकीय कारकीर्द उध्वस्त करण्याचा हा भाजप चा कट आहे. तपासासाठी येथे आलेले बिहारचे पोलीस भाजप नेत्यांच्या बीएमडब्ल्यू व जग्वार गाडीतून फिरले होते. याचा अर्थ हे कटकारस्थान सुरू आहे व कुणालातरी गोवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हा सर्व कट निषेधार्ह आहे, असे सांगून ते म्हणाले की बिहार निवडणुकीसाठी भाजपने तयार केलेला हा अजेंडा आहे.

कालपर्यंत भाजपच सत्तेवर असताना हेच पोलीस त्यांच्या ताब्यात होते आता याच पोलिसांवर भाजपनेते आरोप करत आहेत हे निंदनीय आहे. मात्र आमचा मुंबई पोलिसांवर विश्‍वास असून त्यांच्याच नेतृत्वाखाली हा तपास व्हावा अशी आमची मागणी असल्याचेही सावंत म्हणाले.

रुग्णालयांवर तत्काळ कारवाई करणारी यंत्रणा उभारा!

मुंबई : रुग्णांवर उपचार करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या व त्यांची लूट करणाऱ्या रुग्णालयांवर तत्काळ कठोर कारवाई करणारी यंत्रणा उभारावी, अशी मागणी माहीमच्या नगरसेविका शीतल गंभीर देसाई यांनी केली आहे. 

माहीमच्या एका रुग्णालयात योग्य उपचार न झाल्याने प्रशांत काळे यांचा आठवड्याभरापूर्वी मृत्यू झाला होता. याबाबत श्रीमती देसाई यांनी पोलिसांकडेही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या रुग्णालयाने यापूर्वीदेखील काही रुग्णांकडून जास्त पैसे उकळले होते, त्यावरून महापालिकेने त्यांना कारणे दाखवा नोटिसही दिली आहे. यासंदर्भातच श्रीमती देसाई यांनी वरील मागणी केली आहे. 

काळे यांना मोठ्या रुग्णालयात का पाठविण्यात आले नाही, याचीही महापालिकेतर्फे चौकशी केली जाणार आहे. याप्रकरणी हे रुग्णालय महिनाभर बंद ठेवण्याचा आदेश महापालिकेच्या सहायक आयुक्तांनी दिला आहे. तेथे असलेले रुग्ण इतर रुग्णालयात पाठवावेत व नवे रुग्ण दाखल करून घेऊ नयेत, असेही त्यांना बजावण्यात आले आहे. अशा सर्वच बेजबाबदार रुग्णालयांवर कारवाई करावी, अशी मागणी श्रीमती देसाई यांनी केली आहे.

Edited by swarup jankar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख