भाजप आमदार कालिदास कोळंबकरांना शिवसेनेचा दे धक्का.... - Shivsena makes the bold move in the constituency of MLA Kolambkar | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप आमदार कालिदास कोळंबकरांना शिवसेनेचा दे धक्का....

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

मुंबई महापालिकेवर सत्ता टिकविण्यासाठी शिवसेनेची आतापासूनच पावले... 

मुंबई :  मुंबई महानगर पालिकेच्या तोंडावर शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्के देण्याचा तडाखा लावला आहे. तीन दिवसांपूर्वीच माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. तसेच भाजपचे माजी आमदार हेमेंद्र मेहता यांनीही भाजपला रामराम केला होता.

आता त्या पाठोपाठ सेनेने भाजपच्या आमदाराला अडचणीत आणले आहे. आमदार कालिदास कोळंबकर यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे अँटॉप हिल वडाळा (पूर्व) येथील अनिल कदम आणि दोन टर्म नगरसेविका राहिलेल्या माजी नगरसेविका प्रेसिला कदम तसेच भाजपा प्रणित बेस्ट संघटनेचे कार्याध्यक्ष विवेक घोलप यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातात शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशावेळी विभागप्रमुख मंगेश सातमकर, युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि नगरसेवक अमेय घोले उपस्थित होते. 

ही बातमी वाचा : नारायण राणेंना शिवसेना पुन्हा धूळ चारणार

कदम यांचा हा प्रवेश आमदार कोळंबकर यांच्यासाठी कदम यांचे जाणे अवघड ठरू शकेत. आठ वेळा आमदार असलेले कोळंबकर हे आधी शिवसेनेतच होते. त्यांनी 2004 मध्ये काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. नायगाव, वडाळा या विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. ते आता अॅंटाॅप हिल मतदारसंघाचे आमदार आहेत. 2019 मध्ये झालेल्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाला ते विधानसभेचे हंगामी अध्यक्ष होते. 

एकीकडे भाजप मुंबई मनपा जिंकण्यासाठी स्वप्न पाहत असताना दुसरीकडे सेनेनेही जशास तसे उत्तर देणे सुरू केले आहे. कल्याण, डोंबिवलीमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सेनेत आणून तेथे सेनेची ताकद वाढविण्यासाठी पावले टाकली. आमदार, नगरसेवक नसलेल्या पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशासाठी खुद्द उद्धव ठाकरे उपस्थित राहतात. त्यातून हे पक्षप्रवेश सेनेसाठी किती महत्वाचे आहेत, याचा योग्य तो संदेश इतर कार्यकर्त्यांत जात आहे. 

ही पण बातमी वाचा : बाळासाहेबांच्या भूमिकेशी पंगा घेत शिवसेनेची नवी वाटचाल

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख