Shivsena local offices and jain temples are used as a temporary hospital in Mumbai | Sarkarnama

मुंबईत शिवसेनेच्या शाखांत दवाखाना; जैनमंदिरातही कोरोना उपचार केंद्र !

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 10 जुलै 2020

अन्य सुयोग्य ठिकाणांबरोबरच सध्या रिकाम्या असलेल्या जैन उपाश्रयांमध्येही कोरोना उपचार केंद्रे सुरु व्हावीत यासाठी घाटकोपरचे आमदार पराग शहा यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.

मुंबई: कोरोनाचे भीषण संकट परतवण्यासाठी कोणतेही प्रयत्न शिल्लक ठेवायचे नाहीत असा निर्धार मुंबईकरांनी केला आहे. शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे, नगरसेविका रिद्धी खुरसंगे, नगरसेवक संजय घाडी आदींच्या प्रयत्नांनी शिवसेना शाखांचे रुपांतर तात्पुरत्या उपचार केंद्रात होत आहे. तर भाजप आमदार पराग शहा यांच्या पुढाकाराने जैन प्रार्थनास्थळांचे रुपांतर विलगीकरण केंद्रात केले जात आहे. 

सध्याच्या टाळेबंदीमुळे प्रार्थनास्थळे, शिवसेना शाखा येथे नेहमीप्रमाणे लोकांची गर्दी नाही. त्यामुळेच या रिकाम्या जागांचे रुपांतर कोरोना रुग्णांसाठी करण्याची कल्पना समोर आली. त्यानुसार मागठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे व सौ. खुरसंगे, श्री. घाडी यांनी मागठाणे येथील सहा शिवसेना शाखांचे रुपांतर दवाखान्यात केले आहे. येथे प्रशांत रानडे यांच्यासह अन्य तज्ञ डॉक्टर तैनात आहेत. ते कोरोना रुग्णांसह अन्य रुग्णांवरही औषधोपचार व प्राथमिक तपासणी करतात. येथे गरज असलेल्या रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलेंडरची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. येथील डॉक्टर, कर्मचारी, सहायक आदी सर्वांना पीपीई किट देण्यात आले आहेत. या दवाखान्यांचे सतत निर्जंतुकीकरणही केले जाते. कोरोना रुग्ण किंवा अन्य रुग्णांना दवाखान्यात जागा मिळेपर्यंत जरुर तर या तात्पुरत्या दवाखान्यात राहताही येईल. त्यासाठी येथे तशी व्यवस्थाही केली जात आहे, ही सुविधा विनामूल्य असेल, अशी माहिती सुर्वे यांनी दिली.

अन्य सुयोग्य ठिकाणांबरोबरच सध्या रिकाम्या असलेल्या जैन उपाश्रयांमध्येही कोरोना उपचार केंद्रे सुरु व्हावीत यासाठी घाटकोपरचे आमदार पराग शहा यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. मुंबई भारतीय जनता पक्षाच्या क्वारंटाईन को ऑर्डिनेशन कमिटीचे शहा अध्यक्ष आहेत. कांदिवली व घाटकोपर येथे त्यांनी अशी दोन केंद्रे सुरु केली आहेत. घाटकोपरच्या पारलधाम जैन उपायश्रयात सामान्य प्रकृती असलेल्या पन्नास ते साठ कोरोना रुग्णांवर उपचार होतील. येथे आयसीयू-व्हेंटीलेटर नाही, मात्र ऑक्सीजनची व डॉक्टर-परिचारिकांची व्यवस्था आहे. खासगी रुग्णालये कोरोना रुग्णांची लाखालाखांची बिले फाडत असताना येथे मात्र दिवसाला तीन हजार रुपयांमध्ये सर्व व्यवस्था केली जाते.  अशाच प्रकारे अन्य जैन उपाश्रयात कोरोना उपचार केंद्र निर्माण करण्याचा शहा यांचा विचार आहे. यासाठी संबंधित ट्रस्टींनी परवानगी दिल्यावर तेथे इतर व्यवस्था करून अशी केंद्रे निर्माण केली जातील, असेही शहा यांच्याकडून सांगण्यात आले. यापूर्वी शहा यांनी रामजी अशर विद्यालय आणि लायन्स कम्युनिटी सेंटरमध्ये 80 कोरोना रुग्णांसाठी उपचार केंद्रे सुरु केली आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निरामय सेंटरच्या वतीने व महापालिकेच्या समन्वयाने ही तीनही केंद्रे चालविण्यात येत आहेत.

edited by swarup jankar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख