आणखी तीन महिने 5 रुपयांमध्ये शिवभोजन  - shivbhojan thali in five rupees for next three months chagan bhujbal says | Politics Marathi News - Sarkarnama

आणखी तीन महिने 5 रुपयांमध्ये शिवभोजन 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 जुलै 2020

या निर्णयामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत भुकेलेल्या आणि गरजु नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई : लॉकडाऊन संपलेला असला तरी असामान्य परिस्थिती असल्यामुळे राज्यातील गोरगरीब, कामगार,शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये, यासाठी आणखी तीन महिने 5 रुपयामध्ये शिवभोजन देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

या निर्णयामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत भुकेलेल्या आणि गरजु नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्वकांक्षी निर्णय मार्चमध्ये घेतलेला होता.

मुंबई शहर उपनगर आणि ठाणेमध्ये  1 जून ते  30 जून 2020 पर्यंत 56 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 3 लाख 29 हजार 515 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच 4 हजार 223 स्वस्त धान्य दुकानांमधून 1 जून  ते 30 जून 2020 पर्यंत 17 लाख 99 हजार 252 शिधापत्रिका धारकांना 7 लाख 2 हजार 910 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कैलास पगारे यांनी दिली यांनी दिली.    

मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 87 लक्ष आहे.  या लाभार्थ्यांना 4 हजार 223 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. मुंबई ठाणे मध्ये  या योजनेमधून सुमारे 2 लाख 9 हजार 110 क्विंटल गहू, 1 लाख 40 हजार 660 क्विंटल तांदूळ, तर 128 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर सुमारे 1 लाख 17 हजार 428 शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि. 1 जून ते 30 जून एकूण 13 लाख 77 हजार 604 रेशनकार्ड ला मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्डवर सुमारे 64 लाख लोकसंख्येला 3 लाख 4 हजार क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे.  

 

लॉकडाऊन संपलेला असला तरी असामान्य परिस्थिती असल्यामुळे राज्यातील गोरगरीब, कामगार,शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये, यासाठी आणखी तीन महिने 5 रुपयामध्ये शिवभोजन देण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख