शेतकरी मोर्चाकडे शिवसेनेची पाठ... यावर बाळासाहेब थोरात म्हणतात - Shiv Sena's back to the farmers' front ... says Balasaheb Thorat | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकरी मोर्चाकडे शिवसेनेची पाठ... यावर बाळासाहेब थोरात म्हणतात

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 26 जानेवारी 2021

देशाची मूल्यवान आदर्श घटना, अखंड भारताचं भवितव्य जिच्या हाती आहे, तिला अलीकडच्या सहा वर्षात धक्का लावला जात आहे. मोदी सरकार घटनेतील मुल्ये पाळत नाही.

मुंबई : देशाची मूल्यवान आदर्श घटना, अखंड भारताचं भवितव्य जिच्या हाती आहे, तिला अलीकडच्या सहा वर्षात धक्का लावला जात आहे. मोदी सरकार घटनेतील मुल्ये पाळत नाही. त्यामुळे घटनेचं संरक्षण करावं लागणार आहे, असं सांगत समता हे घटनेचं मुलभूत तत्त्व आहे, तेच काँग्रेसचं तत्त्व आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं. 

राज्यातील प्रदेश काँग्रेस कार्यालय मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधतांना केंद्र सरकारवर टीका केली. 

देशात अराजकता निर्माण होते आहे. संसदेत दूरगामी परिणाम करणारे कायदे करत असताना दुर्देवाने चर्चा होत नाही. दिल्लीला लाखो शेतकर्‍यांनी वेढा घातला आहे, मात्र थंडीत या शेतकऱ्यांना चर्चेत गुंतवून ते कसे थकतील ते बघितले गेले. मोदी सरकार भांडवलदारांचे काम करणारे सरकार आहे, असल्याचे थोरात म्हणाले. 

शेतकऱ्यांना राज्यपालांनी भेट द्याला हवी होती. 

केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्या विरोधात हजारो शेतकरी मुंबईत पायी चालत येतायत हे माध्यमांवर दिसत होतं. एवढ्या मोठ्या संख्येने जेव्हा गरीब शेतकरी मुंबईत येतोय, तो भेटीची वेळ मागतोय अशा वेळी त्यांना वेळ द्यायला हवी होती, अशी अपेक्षा व्यक्त करताना मुंबईपासून गोवा विमानाने एक तासावर आहे. सन्मानीय राज्यपाल गोव्यातून आले असते तर ते जास्त शोभून दिसलं असतं. लोकमताचा आदर करणे ही शासन प्रतिनिधींची जबाबदारी असते. त्यांना फक्त निवेदन घेऊन केंद्राला पाठवायचे होते, असं थोरात म्हणाले. 

शिवसेनेचा मोर्चाला पाठिंबा

मुंबईतल्या आझाद मैदानावर पार पडलेल्या भव्य मोर्चाकडे शिवसेनेच्या नेत्यांनी पाठ फिरवली. यावरुन उलट सुलट चर्चा सुरु आहे. मात्र शेतकरी मोर्चाला शिवसेनेने पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. राज्यात कायदा करणार आहोत त्या समितीतही शिवसेनेचे मंत्री आहेत. आम्ही राज्याचे कृषी कायदे करणार आहोत त्यात त्यांचा सहभाग असणार आहे. लवकरच हा कायदा केला जाईल, असंही थोरात यांनी सांगितलं. 

विद्यार्थ्यांशी चर्चा करुन मार्ग काढू 

विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यामध्ये ते उत्तीर्ण झाले. त्यांची भरती होणार होती मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्टे दिला. त्यामुळे काही अडचणी निश्चितपणे निर्माण झाल्या आहेत. विशेषतः मराठा समाजाच्या मुलांना अडचणी आल्या आहेत, पण आम्ही कायदेशीर बाबतीत सर्व चर्चा करत आहोत. आजही त्यांची इच्छा आहे. 

त्यांच्या मुद्यावर चर्चा व्हावी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हेही चर्चा करत आहेत. त्यांच्याशी चर्चा मी करेन. गेली 6 दिवस विद्यार्थी आंदोललनाला बसले आहेत. त्यांची बाजु ऐकून घेणे ही शासन म्हणून आम्हची जबाबदारी आहे, ती आम्ही पार पाडू. कायदेशीर तांत्रिक स्वरूपाच्या अडचणी आहेत. त्याला आम्ही फाईट करत आहोत. यशस्वी होण्याकरिता आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही कसर कुठेही ठेवत नाहीत. 100 टक्के प्रयत्न करत आहोत. यावर आम्ही यशस्वी होऊ, असे थोरात यांनी सांगितले. 

विजय वड्डेटीवार यांच्याशी चर्चा करु 

मोर्चाचे निवेदण स्विकारताना जालण्यामध्ये विजय वडेट्टीवर यांनी केलेल्या भाषणावरुन मराठा संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यावर बोलताना थोरात म्हणाले की, वडेट्टीवार यांच्याशी मी स्वतः बोलेल त्यांना नक्की काय म्हणायचं होत. यातील बारकावे मला पाहावे लागतील. 

मुंबईत महापौर महाआघाडीचाच 

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप म्हणाले होते. त्यावर थोरात यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मुंबईमध्ये जरी कितीही काहीही झालं तरी महापौर महाआघाडीचाच होईल.   
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख