भाजप नेत्यांनी वेळ, तारीख सांगावी, आम्ही पुन्हा मैदानात येऊ..शिवसेनेचे आव्हान - Shiv Sena spokesperson Sanjana Ghadi warns BJP leaders | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप नेत्यांनी वेळ, तारीख सांगावी, आम्ही पुन्हा मैदानात येऊ..शिवसेनेचे आव्हान

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 17 जून 2021

शिवसेनास्टाईल सणसणीत इशारा शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी यांनी दिला आहे. 

मुंबई :  "शिवसेनेला जशास तसे उत्तर देऊ असे म्हणणाऱ्या भाजपच्या सो कॉल्ड नेत्यांनी फक्त वेळ आणि तारीख सांगावी, आम्ही पुन्हा मैदानात येऊ," असा शिवसेनास्टाईल सणसणीत इशारा शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी यांनी दिला आहे. Shiv Sena spokesperson Sanjana Ghadi warns BJP leaders

बुधवारी दादरच्या सेना भवनासमोर शिवसेना व भाजप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यासंबंधी प्रतिक्रिया देणारा व्हिडियो त्यांनी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केला आहे. कोणी अंगावर आला तर त्याला शिंगावर घ्या, असे सांगणाऱ्या स्व. बाळासाहेबांची ही शिवसेना आहे. राममंदिर हा प्रत्येक हिंदूच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. पण त्याच्या जमिनीच्या खरेदीत झालेल्या घोटाळ्याची वृत्ते प्रसिद्ध झाल्याचा राग भाजपकडून शिवसेनेवर काढला जातो हे म्हणजे वड्याचे तेल वांग्यावर काढण्याचाच प्रकार आहे, असाही टोला घाडी यांनी लगावला आहे. 

राममंदिराच्या जमिनखरेदीत भ्रष्टाचार झाल्याबाबतच्या आरोपांची अंतिम जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचीच आहे. ज्यांनी हे भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात व भाजप्रणित संघटना या बाबींना पाठिंबा देतात, हीच भाजपची रामराज्याची संकल्पना दिसते, असा टोमणाही शिवसेना प्रवक्त्यांनी लगावला आहे. 

राममंदिराप्रमाणे आमचे मंदिर असलेल्या शिवसेनाभवनावर आंदोलन करून याचा राग काढण्याचा प्रयत्न भाजपने केला. सेनाभवनावर असा हल्ला कराल तर शिवसेनेच्या रणरागिणीही मैदानात उतरतील व तुम्हाला उत्तर द्यायला त्या तयार असतील. तुमच्यावर आरोप होत असताना तुमची बाजू सत्याची असेल तर योग्यप्रकारे ती मांडण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. ते न करता उलट फक्त शिवसेनेवर राग काढण्यासाठी आक्रस्ताळेपणे सेनाभवनावर चालून आलात तर आम्हीही स्वस्थ बसणार नाही. शिवसेनेला जशास तसे उत्तर देण्याच्या बाता मारणाऱ्या भाजप नेत्यांनी फक्त वेळ आणि तारीख सांगावी, आम्ही पुन्हा मैदानात येऊ, असा इशाराही घाडी यांनी दिला. 

कोरोनाबळी, भ्रष्टाचार, सामान्यांवरील अन्याय या ज्वलंत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी अशा किरकोळ मुद्यांवरून राडे करण्याचा भाजपचा हा डाव आहे. आधीच पिचलेल्या जनतेचे अशा आंदोलनांनी कणभरही भले होणार नाही. यापेक्षा शेतकरी आंदोलन, गरीबांची उपासमार, केंद्राकडून होणारा अपुरा लसपुरवठा अशा महत्वाच्या मुद्यांवर भाजपने आंदोलने केली, तर त्यांना लोकांचा दुवा तरी मिळेल, असा टोलाही घाडी यांनी लगावला आहे.
 Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख