लव्ह जिहादविरोधी कायदा करून शिवसेनेने हिंदुत्व अबाधित असल्याचे दाखवून द्यावे  - Shiv Sena should enact anti-love jihad law : Prasad Lad | Politics Marathi News - Sarkarnama

लव्ह जिहादविरोधी कायदा करून शिवसेनेने हिंदुत्व अबाधित असल्याचे दाखवून द्यावे 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

आपणही महाराष्ट्रात असाच कठोर कायदा लागू करून लव्ह जिहाद सारख्या धर्मसंकटातून राज्यातील लेकी बाळींचे रक्षण करावे.

मुंबई : शिवसेनेचे हिंदुत्व आजही अबाधित आहे अशी आशा आहे. पण, हिंदुत्वावर संकट ओढवले असताना आपण स्वस्थ कसे बसू शकता, असे सुनावत लव्ह जिहाद विरोधी कायदा करावा आणि या संदर्भातील भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले. 

राज्यातील लेकी बाळींचे, माता भगिनींचे रक्षण करण्यासाठी असा कायदा आवश्‍यक आहे. देशातील अनेक राज्यांत कठोर शिक्षेची तरतूद असणारा असा कायदा करण्यात आला आहे, असेही विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांनी दाखवून दिले. 

माता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यासारख्या वीरांगनांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात सातत्याने महिलांवरील अत्याचारांच्या घटना समोर येत आहेत. लव्ह जिहाद हा देखील त्यातलाच एक प्रकार आहे. अनेक राज्यांनी या प्रकरणी कठोर धर्म स्वातंत्र्य कायदा लागू केला आहे. मध्य प्रदेश सरकारने असा आंतरधर्मीय विवाहासंबंधी कायदा लागू करण्याचे घोषित केले आहे. त्यानुसार दोषींना पाच वर्षांची शिक्षा दिली जाईल. उत्तर प्रदेश, हरियाना व पंजाब सरकारने देखील अशाच प्रकारचा कायदा आणण्याची घोषणा केली आहे, असेही लाड यांनी दाखवून दिले आहे. 

आपणही महाराष्ट्रात असाच कठोर कायदा लागू करून लव्ह जिहाद सारख्या धर्मसंकटातून राज्यातील लेकी बाळींचे रक्षण करावे. काही षडयंत्री लोकांकडून स्वतःची खरी ओळख लपवून लेकी बाळींची फसवणूक करून लव्ह जिहाद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे षडयंत्री लोक प्रेमाचा बनाव करून फक्त धर्मांतरासाठी हिंदूधर्मीय तरुणींना फसवून, फूस लावून त्यांच्याशी विवाह करीत आहेत. या मुलींचा शारीरिक, मानसिक व लैंगिक छळही करीत आहेत. गेल्या काही वर्षांपासून या मुद्यावर राजकीय चर्चा सुरू आहे. मात्र, अजूनही याबाबत राज्य सरकारकडून ठोस पावले टाकली जात नाहीत, असेही लाड यांनी म्हटले आहे. 

साक्षात मॉंसाहेबांचा पुत्र मुख्यमंत्री असलेल्या महाराष्ट्रात आज सातत्याने महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे आपण लव्ह जिहाद सारख्या गंभीर विषयांकडे स्वतः लक्ष देऊन दोषींना कठोर शासन करण्यासाठी असा कायदा लागू करावा. हा कायदा महाराष्ट्रात लागू करण्याबाबत आपण तत्काळ आपली भूमिका स्पष्ट करावी आणि हिंदू माता भगिनींवर येणारे धर्मसंकट दूर करावे, असेही आवाहन लाड यांनी केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख