ती फाईल राजभवनातच; राज्यपालांनी सही केली तर आम्ही पेढे वाटू

ही काही बोफोर्स, राफेल किंवा एखाद्या ठेकेदाराची फाईल आहे का, असा सवाल राऊत यांनी विचारला आहे.
 Sanjay Raut, Bhagat Singh Koshyari .jpg
Sanjay Raut, Bhagat Singh Koshyari .jpg

मुंबई :  राज्यपालनियुक्त 12 नामनिर्देशित आमदारांच्या नावांची फाईल भुताने पळवली नसून ती राजभवनातच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता राज्यपालांनी सही करावी, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी पदाला शोभणारे काम केले पाहिजे. आता त्यांनी विधानपरिषदेतील 12 आमदारांच्या फाईलवर सही केली की आम्ही पेढे वाटू, असा टोला त्यांनी लगावला आहे. (Shiv Sena MP Sanjay Raut criticizes Governor Bhagat Singh Koshyari)

ते मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बारा आमदारांच्या नावासंदर्भात इतके दिवस उलटूनही निर्णय का होत नाही? ही काही बोफोर्स, राफेल किंवा एखाद्या ठेकेदाराची फाईल आहे का, असा सवाल राऊत यांनी विचारला आहे. राज्याच्या मंत्रिमडळाने एकमताने मंजूर केलेल्या आमदारांची नावे आहेत. त्यावर ८ महिने निर्णय होत नसेल तर महाराष्ट्राच्या गतिमान प्रशासनाच्या परंपरेला ते न शोभणारे आहे, राज्यपाल हे राज्याचे प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांनी या गोष्टीचे भान ठेवावे, असे राऊत यांनी म्हटले आहे. 

राज्यपालनियुक्त 12 नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राज्यपालांना दिलेली 12 आमदारांची यादी भुतांनी पळवली तर नाही ना?, अशी खोचक टीका राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती. त्यानंतर आता 12 आमदारांची यादी राजभवनात (RajBhavan) सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. 

टुलकीतचे प्रकरणाची सध्या देशात चर्चा सुरू आहे. पण सगळ्या समाजमाध्यमानवर भाजप ने विरोधकांसाठी त्याचा वापर केला आहे, प्रकरण त्यांच्यावर उलटल्यावर छापा टाका, याला पकडा त्याला पकडा असे सगळे उद्योग सुरू असल्याचे राऊत यांनी सांगितले.

सरसंघचालक मोहन भागवत आदरणीय आहेत, परखडपणे त्यांनी मत व्यक्त करावे अशी आमची अपेक्षा असते. त्यांच्या भूमिकेला, मताला या देशात आजही महत्व दिले जाते. पण गेल्या काही महिन्यांपासून सगळेच गप्प आहेत. विशेषतः गंगेच्या प्रवाहात हजारो मृतदेह वाहून आले, त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले नाहीत. हा विषय हिंदुत्वचा होता, राममंदिरा इतकाच महत्वाचा होता. त्यावर या देशातील हिंदुत्ववादी नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्ष जनतेला होती. आजही सरसंघचालकांना आवाहन करतो की त्यांनी आपले मत व्यक्त करावे, असेही राऊत म्हणाले. 

दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल सचिवालयाकडे 12 आमदारांच्या नावाची यादी मागितली होती. मात्र, सचिवालयाने अशी यादी उपलब्ध नसल्याचे सांगितले होते. त्यावरुन राजकारण सुरु झाले होते. अखेर गोपनीयतेच्या कारणामुळे राजभवनाला ही यादी देता येणे शक्य नसल्याचे स्पष्टीकरण सचिवालयाकडून देण्यात आले. मात्र, आता 12 आमदारांची ही यादी राजभवनातच असल्याने राज्यपाल कोश्यारी त्याबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या प्रकरणी उच्च न्यायालयानेही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com