भाजपला घाबरविण्यासाठी शिवसेनेने कॉंग्रेसची साथ घेतली अन्‌ पक्ष शिकार बनला : संजय निरूपम  - Shiv Sena joins hands with Congress to intimidate BJP | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपला घाबरविण्यासाठी शिवसेनेने कॉंग्रेसची साथ घेतली अन्‌ पक्ष शिकार बनला : संजय निरूपम 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 27 सप्टेंबर 2020

 प्रारंभीपासून शिवसेनेबरोबर आघाडी करण्यास तयार नसलेले निरूपम यांनी आज पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

मुंबई : शिवसेनेकडून कॉंग्रेसला कधीही धोका होऊ शकतो हे पहिल्यापासून सांगत होतो. भाजपला घाबरविण्यासाठी शिवसेनेने कॉंग्रेसची साथ घेतली आणि आमचा पक्ष शिकार बनला असा गंभीर आरोप कॉंग्रेसचे फायरब्रॅंड नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी केला आहे. 

राज्यात भाजपची साथ सोडताना शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी राज्यात शिवसेनेला सत्तेवर आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेचे सरकार सत्तेवर आले खरे पण, अशाप्रकारे शिवसेनेबरोबर आघाडी करण्यास खुद्द राहुल गांधीही तयार नव्हते. त्यावेळी बऱ्याच बैठका झाल्या आणि शेवटी सोनिया गांधी, राहुल आणि प्रियंका गांधी तयार झाल्या. मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांची निवड झाली. 

मात्र प्रारंभीपासून शिवसेनेबरोबर आघाडी करण्यास तयार नसलेले निरूपम यांनी आज पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची काल बैठक झाली. या बैठकीनंतर राज्याचे राजकारण पार ढवळून निघाले आहे. शंकाकुशंका घेतल्या जात आहेत. राज्यात पुन्हा भाजप-शिवसेनेचे सरकार येणार का ? याची जोरदार चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र ही बैठक फडणविसांच्या मुलाखतीसंदर्भात होती अशी माहितीही पुढे आली आहे. 

संजय राऊत आणि फडणवीस यांच्या बैठकीनंतर संजय निरूपम यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त करीत पक्षाला घरचा आहेर दिला आहे. निरूपम म्हणाले, की 
राज्यात सत्ता आल्यानंतर आमच्या पक्षाचा जो कोणताही कार्यक्रम असला की आमच्या लोकांनी शिवसेनेचे फोटो लावले पण, शिवसेनेने कधीही आमच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे फोटो लावले नाहीत. ते लावत नाहीत. कारण शिवसेनेला कॉंग्रेसविषयी ममत्व नाही आणि आपलेपणाही नाही. उलट शिवसेनेने भाजपला घाबरविण्यासाठी आणि इशारा देण्यासाठी कॉंग्रेसची साथ घेतली. सत्तेचे समीकरण बनले आणि कॉंग्रेसच शिकार बनली. 

चंद्रकांतदादांचीही शिवसेनेवर टीका 
अभिनेत्री कंगना राणावत हिच्या स्टेटमेंटशी आम्ही कधीच सहमत नाही. पण, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. येथे महिलांचा नेहमीच सन्मान केला गेलाय. मात्र एका महिलेच्या मागे लांडग्या सारखा लागता. तिचं ऑफीस तोडता, हरामखोर सारखी भाषा वापरता यावर आम्ही बोललो असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. 

अर्थात शिवसेनेने कंगना राणावत हिला शिवसेनेने ज्याप्रमाणे लक्ष्य केले होते त्याकडे चंद्रकांतदादांनी लक्ष वेधले. "सरकारनामा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत चंद्रकांतदादा बोलत होते.

अभिनेत्री कंगना राणावत असेल किंवा दिपिका पदुकोण यांच्या संदर्भाने भाजपची जी भूमिका आहे. ती मुंबई पोलीस किंवा मराठी माणूस,महाराष्ट्राविरोधात आहे असे परसेप्शेन आहे याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, कंगना राणावतच्या मताशी आम्ही सहमत नाही. पण, महाराष्ट्रात नेहमीच महिलांचा केला केला जातो. 

दादांचा बोलण्याचा रोख शिवसेनेकडेच होता जरी त्यांनी शिवसेनेचे नाव घेतले नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख