मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या शिवसेनेकडे - Shiv Sena has the keys of Mumbai Municipal Corporation treasury | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या शिवसेनेकडे

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

स्थायी समितीवर शिवसेनेच्या यशवंत जाधव यांची सलग तिस-यांदा निवड झाली आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेतील अर्थकारणाच्या दृष्टीनं महत्वाच्या स्थायी समितीवर शिवसेनेच्या यशवंत जाधव यांची सलग तिस-यांदा निवड झाली आहे. शिवसेनेच्या यशवंत जाधव यांची स्थायी समिती अध्यक्षपदासाठी हॅटट्रिक केली आहे. शिक्षण समिती पाठोपाठ स्थायी समितीतही अर्ज मागे घेत काँग्रेसनं आघाडी धर्म पाळला आहे. यशवंत जाधव यांचा ५ मतांनी विजय झाला.

मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे म्हणाले, "मुंबई महापालिकेतला विरोधी पक्ष हा शिवसेना पुरस्कृत आहे हे आज यानिमित्ताने सिद्ध झालं आहे. शिवसेनेसोबत विरोधी पक्ष काँग्रेसचे "अर्थपूर्ण" साटेलोटेआहे. कॅाग्रेसच्या विरोधी पक्ष नेत्यांनी नैतिक जबाबदारी ओळखून राजीनामा द्यावा. यापुढील पुढच्याही सर्व निवडणूकांमध्ये भाजप विरोधी पक्ष म्हणून प्रामाणिकपणे निवडणूक लढवेल. भाजपची दोन नगरसेविकांची मते फुटली आणि अवैध ठरल्यानं वाया गेली..हे जाणिवपूर्वक झालं की अनवधानानं हे माहित नाही...पण, पक्ष संबंधित नगरसेविकांवर कारवाई करेल."

काँग्रेस आणि शिवसेनेची पडद्यामागे हातमिळवणी झाल्याचं बोललं जात आहे. तसंच सर्व समित्यांच्या अध्यक्षपदावर शिवसेनेचाच उमेदवार बसणार, असा विश्वास शिवसेना नेते अनिल परब यांनी व्यक्त केला होता.  महापालिकेत स्थायी समितीच्या निवडणुकीत काँग्रेस ऐन वेळी माघार घेईल, असं सूचक वक्तव्य अनिल परब यांनी केलं होतं. 

केवळ स्थायी समितीच नाही तर सर्वच समित्यांवर शिवसेनेचाच अध्यक्ष निवडून येईल आणि शिवसेनेचा बीएमसीतील गड अबाधित राहील, असा विश्वासही परब यांनी व्यक्त केला होता. अनिल परब म्हणाले होते की राज्यात काँग्रेस आणि शिवसेनेची महाविकास आघाडी आहे, हे भाजपने कायम ध्यानात ठेवलं पाहिजे. त्यामुळे मुंबई महापालिकेत जरी काँग्रेस विरोधी बाकांवर असली, तरी सेनेला त्यांची अडचण नाही. 

आज शिक्षण समिती, स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक झाली. शिक्षण समितीसाठी भाजपकडून सुरेखा पाटील, शिवसेनेकडून संध्या दोषी, तर काँग्रेसकडून संगीता हंडोरे यांनी अर्ज भरले होते. स्थायी समितीसाठी भाजपकडून मकरंद नार्वेकर, शिवसेनेकडून यशवंत जाधव आणि काँग्रेसकडून आसिफ झकेरिया मैदानात उतरल्या होत्या.  

 स्थायी समिती निवडणूक 

  1. सेना- 14 ( १ एनसिपी + १ सपा पाठिंबा) 
  2. भाजप - 9 
  3. काॅग्रेस - 3  
     
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख