भाजप हरला आणि कोरोना जिंकला..शिवसेनेची टीका.. मस्तवाल राजकारणास मिळालेली चपराक - Shiv Sena criticizes Narendra Modi over Bengal elections | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप हरला आणि कोरोना जिंकला..शिवसेनेची टीका.. मस्तवाल राजकारणास मिळालेली चपराक

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 3 मे 2021

पराभवाची नैतिक जबाबदारी कोणी घ्यायची ते त्यांनीच ठरवायला हवे.

मुंबई : तृणमूल कॅाग्रेसला बंगालमध्ये स्पष्ट बहुमत मिळाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी नुसता गडगडात केला, पण बंगालमधील जनता आपल्या मातीतल्या माणसासाठी ठामपणे उभी राहिली, असे म्हणत शिवसेनेचे मोदी-शाह यांच्यावर टीका केली आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून बंगालच्या निवडणुकीवर भाष्य करण्यात आले आहे. 

प. बंगालात ममता बॅनर्जी यांनी विजयाची ‘हॅट्ट्रिक’ साधली. इतकेच नव्हे, तर मोदी-शहांनी उभे केलेले तुफान रोखत भाजपचा डाव शंभरच्या आत ‘ऑल आऊट’ करून टाकला. ममता दीदी 2 मेनंतर घरी जातील अशा गमजा केल्या गेल्या. ‘2 मई दीदी गई’ असा घोषा पंतप्रधान मोदी जाहीर सभांतून लावत होते. ममता यांना घरी बसविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पैसा, सत्ता व सरकारी यंत्रणेचा पूरेपूर वापर केला. तरीही ममता बॅनर्जी यांनी जिद्दीने विजय मिळविला. हा विजय म्हणजे मस्तवाल राजकारणास मिळालेली चपराक आहे. प. बंगालच्या निवडणुकीचे विश्लेषण एका वाक्यात करायचे तर भाजप हरला आणि कोरोना जिंकला, असे अग्रलेखात म्हटलं आहे. 

पराभवाची नैतिक जबाबदारी कोणी घ्यायची ते त्यांनीच ठरवायला हवे. देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री एखादी निवडणूक व्यक्तिगत प्रतिष्ठेची करतात तेव्हा जय-पराजयाचे श्रेय त्यांनीच स्वीकारायचे असते व राजकारणात तीच परंपरा आहे. पाच राज्यांतील निवडणूक निकालांमुळे देशात असे घडेल आणि तसे घडेल अशा पैजा लागल्या, पण नवे काय घडले? आसाम सोडले तर भारतीय जनता पक्षाने सर्वत्र मातीच खाल्ली आहे. केरळात डाव्यांनी पुन्हा सत्ता राखली. तेथे सामना काँग्रेसशी झाला. तामीळनाडूत ‘द्रमुक’ने सत्ता मिळवली. पुद्दूचेरी ही 30 आमदारांची विधानसभा. तेथे भाजपने विजय मिळवला. 

केरळात भाजपने वयाची 80 पार केलेले ‘मेट्रो मॅन’ श्रीधरन यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले. तेथे भाजपला 5 जागाही जिंकता आल्या नाहीत. याचा अर्थ असा की, मोदी-शहांच्या भाजपकडे निवडणुका जिंकण्याचे तंत्र व यंत्र असले तरी ते अजिंक्य नाहीत व त्यांच्या बोलघेवडेपणावर शहाणीसुरती जनता विश्वास ठेवेलच असे नाही. प. बंगालची वाघीण ऐन निवडणुकीत जखमी झाली. त्या जखमी वाघिणीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दिली आहे. प. बंगालच्या जनतेचेही अभिनंदन करावे तेवढे थोडेच. प. बंगालची जनता धूर धुक्यात हरवली नाही. कृत्रिम लाटेत वाहून गेली नाही. आपल्या मातीतील माणसांच्या प्रतिष्ठेसाठी बंगाली जनता ठामपणे उभी राहिली. देशाने प. बंगालकडून शिकावे, असा प्रसंग घडला आहे, असे अग्रलेखात नमूद केलं आहे. 

काय म्हटलं आहे 'सामना'च्या अग्रलेखात.... 
 पंतप्रधान मोदींसह संपूर्ण केंद्र सरकार प. बंगालात ममता बॅनर्जी व त्यांच्या तृणमूल काँग्रेसला हरविण्यासाठी उतरले होते. प. बंगाल जिंकता यावे म्हणून तेथे मतदानाच्या आठ फेऱया लादण्यात आल्या. पण झाले काय? तृणमूल काँग्रेसने मोदी, शहांसह संपूर्ण केंद्र सरकार व भाजपला धूळ चारली आहे. प. बंगालात ममता बॅनर्जी यांनी विजयाची ‘हॅट्ट्रिक’ साधली. इतकेच नव्हे, तर मोदी-शहांनी उभे केलेले तुफान रोखत भाजपचा डाव शंभरच्या आत ‘ऑल आऊट’ करून टाकला. ममता दीदी 2 मेनंतर घरी जातील अशा गमजा केल्या गेल्या. ‘2 मई दीदी गई’ असा घोषा पंतप्रधान मोदी जाहीर सभांतून लावत होते. ममता यांना घरी बसविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पैसा, सत्ता व सरकारी यंत्रणेचा पूरेपूर वापर केला. तरीही ममता बॅनर्जी यांनी जिद्दीने विजय मिळविला. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख