Shiv Sena criticizes Modi government for presenting the grim reality of Corona | Sarkarnama

कोरोनाचे भीषण वास्तव मांडत शिवसेनेची मोदी सरकारवर टीका 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

अर्थव्यवस्थेची घसरण नियंत्रणात येणार नाही. कारण करोनाच्या दहशतीमुळे ग्राहकांची मानसिकता सावधगिरीचीच राहील आणि त्याचा परिणाम बाजारपेठेवर होईल याकडेही शिवसेनेने लक्ष वेधले आहे.  

मुंबई : शिवसेनेने कोरोनाच्या मुद्यावरून केंद्रातील भाजप सरकारला लक्ष्य करीत काही प्रश्‍न उपस्थित केले आहेत. जगात आणि देशात करोनाचा कहर थांबायला तयार नाही. आपल्या देशातील करोनाग्रस्तांची संख्या 50 लाखांपेक्षा वर गेली आहे. करोनामुळे मरण पावलेल्यांचा आकडाही 82 हजारांपेक्षा जास्त झाला आहे. जगातदेखील यापेक्षा वेगळे चित्र नाही. 

करोना रुग्णांचा आणि बळींचा आलेख खाली यायला तयार नाही. त्यामुळे होणारे दुष्परिणामही कमी होण्याची चिन्हे नाहीत. करोना हा भयंकर साथीचा आजार असल्याने मानवी आरोग्य तर धोक्‍यात आले आहेच, शिवाय लॉकडाउनमुळे आर्थिक गतीही ठप्प झाली आहे. 

बिल ऍण्ड मेलिंडा गेटस्‌ फाऊंडेशनच्या अहवालाने ही महाभयंकर वस्तुस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. या करोनाग्रस्त महिन्यांनी जगातील चार कोटी लोकसंख्येला दारिद्रय रेषेखाली ढकलले आहे. या 25आठवड्यांमुळे जग 25 वर्षे मागे गेले आहे, असे भीषण वास्तव या अहवालाने मांडले आहे.

करोनाचा आर्थिक तडाखा सुमारे 12 अब्ज डॉलर्स एवढा असून जगाची गरिबी सात टक्‍क्‍यांनी वाढली आहे. जगातील दोनशेपेक्षा जास्त देश करोनाच्या तावडीत सापडले आहेत. त्यात आपला देशही आहे. आधीच गडगडलेली आपली अर्थव्यवस्था करोना आणि लॉकडाउनमुळे रसातळाला गेली आहे. 

व्यापारी तूट कमी झाली हा दिलासा असला तरी दीर्घकालीन दृष्टिकोनातून ही परिस्थिती म्हणजे हिंदुस्थानच्या विकासाचा रिव्हर्स गियर अशीच म्हणावी लागेल. गेटस्‌ फाऊंडेशनच्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष हाच आहे. आपल्या देशात 12 कोटींचा रोजगार आधीच बुडाला आहे. अनेक उद्योग बंद पडले आहेत. जे सुरू आहेत तेदेखील रडतखडत सुरू आहेत.

त्यात आणखी 1 कोटी 75 लाख छोटे-मोठे उद्योग-व्यवसाय बंद पडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. हे सगळे लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योग असल्याने त्याचा थेट परिणाम बेरोजगारी वाढण्यात होणार आहे. भारताची अर्थव्यवस्था तब्बल नऊ टक्‍क्‍यांनी आकुंचन पावेल असाही एक अंदाज आहे. 

अर्थव्यवस्थेची घसरण नियंत्रणात येणार नाही. कारण करोनाच्या दहशतीमुळे ग्राहकांची मानसिकता सावधगिरीचीच राहील आणि त्याचा परिणाम बाजारपेठेवर होईल याकडेही शिवसेनेने लक्ष वेधले आहे.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख