फडणवीस म्हणतात त्यात तथ्य नाही असे नाही, पण लॉक डाऊनशिवाय पर्याय नाही....

लॉकडाउन झाले तरी जनतेला दिलासा देता येईल, असे शिवसेनेने विरोधकांना सांगितले.
संजय ७.jpg
संजय ७.jpg

मुंबई : महाराष्ट्रात लॅाकडाउन करण्याची परिस्थिती असताना सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दीक युद्ध सुरू आहे.  राज्यातील विरोधी पक्षाने दिल्लीत जाऊन महाराष्ट्राची ही बाजू भक्कमपणे मांडली तर राज्यहिताचे श्रेय त्यांनाच मिळेल व लॉक डाऊन झाले तरी जनतेला दिलासा देता येईल, असे शिवसेनेने विरोधकांना सांगितले.  

15 एप्रिलनंतर राज्याची कोरोना स्थिती गंभीर होईल असे मुख्य सचिव सीताराम कुंटे हेच जेव्हा सांगतात तेव्हा त्याचे गांभीर्य विरोधी पक्षाने समजून घेतले तर बरे होईल. ‘अर्थचक्र की अनर्थचक्र?’ यावर तत्काळ निर्णय घ्यायलाच हवा. लोकांना समजावण्याचे काम जसे सरकार पक्षाचे आहे तसे विरोधी पक्षाचेही आहे. केंद्र सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही, पळ काढता येणार नाही, असे 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेनेने विरोधकांना सुनावले आहे. 


महाराष्ट्रात कडक लॉक डाऊन लावावेच लागेल असे संकेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत. विरोधी पक्षाला लॉक डाऊनमुळे लोकांचे अर्थचक्र बिघडेल अशी भीती वाटणे स्वाभाविक आहे, पण सध्या माणसांचे प्राण गमावण्याचे जे ‘अनर्थचक्र’ सुरू आहे ते थांबवायचे तर कडक लॉक डाऊन आणि निर्बंध अपरिहार्य असल्याचे मुख्यमंत्र्यांचे सांगणे आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीस उपस्थित होते. श्री. फडणवीस व त्यांच्या पक्षाचे लॉक डाऊनसंदर्भात वेगळे मत आहे. लॉक डाऊन नकोच, तसे काही झाले तर लोकांचा उद्रेक होईल असे जे फडणवीस म्हणतात त्यात अजिबात तथ्य नाही असे नाही, पण कोरोना संक्रमणाची साखळी तोडायची असेल तर लॉक डाऊनशिवाय पर्याय नाही, असे अग्रलेखात म्हटलं आहे. 

काय म्हटलं आहे 'सामना'च्या अग्रलेखात...

आता त्याऐवजी दुसरा काही पर्याय असेल तर श्री. फडणवीस यांनी सांगावे. नोटाबंदी, लॉक डाऊन या विषयाची ओळख पंतप्रधान मोदी यांनी देशाला करून दिली आहे. भ्रष्टाचाराची साखळी तुटावी म्हणून नोटाबंदी व कोरोना संक्रमणाची साखळी तुटावी म्हणून मोदी यांनी लॉक डाऊनची घोषणा एक वर्षापूर्वी केली होती तेव्हा भाजप कार्यकर्त्यांनी त्या निर्णयाचे थाळय़ा वाजवून स्वागत केले. आज कोरोनाची परिस्थिती आधीपेक्षा जास्त गंभीर झाली आहे याचे भान महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने ठेवले तर जनतेवर उपकार होतील. महाराष्ट्रात शनिवारी 59,411 इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, 309 रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसारखी ठिकाणे हॉटस्पॉट बनली. देशातला कालचा आकडा दीड लाखावर गेला. हे चित्र धक्कादायक आहे. त्यामुळे या संकटाकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहायला हवे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री नाही याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेने का मोजावी? आणि बाजूच्या गुजरात राज्यात भाजपचे राज्य असूनही तेथे कोरोना आटोक्यात आला असे नाही. उलट सुरत, अहमदाबादेत कोरोनाचे रुग्ण रस्त्यावर, फुटपाथवर पडेपर्यंत प्रकरण हाताबाहेर गेले आहे. 
 Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com