संभाजीराजेंनी लढाईचे मैदान दिल्लीतच ठरवले तर निकाल लागेल!

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा तिढा जसा दिल्लीत पडला होता तसाच मराठा आरक्षणाचा तिढाही दिल्लीतच पडला आहे. हा तिढा दिल्लीनेच सोडवावा.
Chhatrapati Sambhaji Raje.jpg
Chhatrapati Sambhaji Raje.jpg

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण (Maratha reservation) कायदा रद्द केल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात विविध पर्यायांची चाचपणी केली जात आहे. मराठा समाजाने रस्त्यावर उतरावे, असे भारतीय जनता पक्षाकडून सांगितले जात आहे. त्यातच खासदार छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी मात्र, या भूमिकेला विरोध केला आहे. तसेच त्यांनी राज्यभर दौरा सुरू करुन, विविध राजकीय नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरूवात केली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजे यांनी राज्य सरकारला इशारा दिला असून, त्यावरुन शिवसेनेने (Shiv Sena) भाष्य करत समनाच्या अग्रलेखातून भूमिका मांडली आहे. (Shiv Sena clarified its views on Maratha reservation)

अग्रलेखात म्हटले आहे की, मराठा आरक्षणाबाबत छत्रपती संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ६ जूनपर्यंत निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. खासदारकीचाही राजीनामा देऊ, असे त्यांनी म्हटले आहे. बहुजन समाजाची इच्छा असेल तर वेगळा पक्ष काढू, असे सूतोवाचही त्यांनी केले आहे. छत्रपती संभाजीराजे वंचीत बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनाही भेटले. दोघांत राजकीय खलबते झाली. बहुजनांच्या हितासाठी एकत्र काम करण्याचे सूतोवाचही दोन्ही नेत्यांनी केले. आंबेडकर व छत्रपतींनी एकत्र येऊन नवा राजकीय पक्ष काढला तर काय होईल? आंबेडकरांनी काल कुठेतरी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणातील शिळेपणा कमी होईल. एक लक्षात घेतले पाहिजे छत्रपती संभाजीराजे हे सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत व छत्रपतींची ही नियुक्ती राष्ट्रपतींकडून भारतीय जनता पक्षाने करून घेतली आहे. 

छत्रपतींना या उपकाराची आठवण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करून दिल्याने लोकांत नाराजी निर्माण झाली. त्यामुळे छत्रपती काय भूमिका घेतात ते पाहायचे. छत्रपती संभाजीराजे फक्त आंबेडकरांनाच भेटले नाहीत, तर राज्यातील बहुतेक सर्वच प्रमुख नेत्यांना ते भेटले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, (Uddhav Thackeray) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, (Sharad Pawar) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र नविर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अशा नेत्यांना भेटून त्यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाला न्याय मिळायलाच पाहिजे व त्यासाठी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावायलाच हवा, ही त्यांची भूमिका आहे,” असे शिवसेनेने म्हटले आहे. (Shiv Sena clarified its views on Maratha reservation)

छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेला कोणीच विरोध करत नाही, पण महाराष्ट्र सरकारने आरक्षणाबाबत केलेला कायदा व घेतलेली भूमिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. आरक्षणाबाबत कायदा करण्याचा अधिकार फक्त केंद्र सरकारलाच असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टच सांगितले. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन राजभवनात पोहोचले. राज्यपालांना निवेदन दिले व मराठा आरक्षणाचा तिढा केंद्र सरकारने लवकारात लवकर सोडवावा, असे हात जोडून सांगितले. राज्यपाल हे केंद्राचे राजदूत आहेत. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपतींना कळवतील. म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचे सरकार याप्रश्नी शर्थ करीत असले, तरी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपतींनाच निर्णय घ्यायचा आहे. राज्याचे सरकार मराठा आरक्षणप्रश्नी हात झटकू शकत नाही. हात झटकत आहे ते केंद्र सरकार. म्हणूनच मराठा आरक्षणप्रश्नी दिल्ली दरवाजावर हत्तीची टक्कर देणे आवश्यक आहे व ही धडकच निर्णायक ठरेल.

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा तिढा जसा दिल्लीत पडला होता तसाच मराठा आरक्षणाचा तिढाही दिल्लीतच पडला आहे. हा तिढा दिल्लीनेच सोडवावा. महाराष्ट्राला तो अधिकार नाही, असे सर्वोच्च न्यायालयानेच स्पष्ट केले आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी आता याप्रश्नी लढाईचे मैदान दिल्लीतच ठरवले तर निकाल लागेल. राजधानी दिल्लीमध्ये ९ ऑगस्ट रोजी मराठा समाजाची गोलमेज परिषद घेण्याचे छत्रपतींनी ठरवलेच आहे. ही परिषद राजकारणविरहीत व्हावी. बहुजन समाजाचा बुलंद आवाज म्हणून दिल्लीला त्या गोलमेज परिषदेची दखल घ्यावीच लागेल. मराठा आरक्षणप्रश्नी कोणी दुटप्पी भूमिका घेऊ नये. महाराष्ट्राचे राजकारण अस्थिर करण्यासाठी विरोधी पक्ष मराठा आरक्षण मुद्द्याचा वापर हत्यार म्हणून करीत असतील तर त्यांना वेळीच रोखावे लागेल. राज्याच्या जडणघडणीत मराठा समाजाचे योगदान मोठे आहे. 

पण आज हा स्वाभिमानी, कष्ट करणारा समाज आर्थिकदृष्ट्या पीछेहाटीस लागला. निसर्गाच्या अवकृपेने शेती होत नाही. नोकऱ्यांचा दुष्काळ आणि शैक्षणिक क्षेत्रात आधार नाही. म्हणूनच शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या या समाजाला १६ टक्के आरक्षण देणारा कायदा महाराष्ट्र सरकारने केला, पण सर्वोच्च न्यायालयाने त्यावर आक्षेप घेतला. त्यामुळे पुढची लढाई दिल्लीतच लढावी लागेल. मराठा आरक्षणाबाबत ठाम भूमिका महाराष्ट्र सरकारने घ्यावी, असे छत्रपती संभाजीराजे सांगतात. पण शेवटी निकाल दिल्लीलाच घ्यायचा आहे. त्यामुळे मराठ्यांच्या स्वाभिमानाची धडक दिल्लीच्या दरवाजावरच मारावी लागेल. ‘दो कवडी के मोल मराठा बिकने को तैयार नहीं’ हा संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा माहोल दिल्लीत पुन्हा निर्माण करावा लागेल, असे मत शिवसेनेने मांडले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com