वाझेंना अटक करून एनआयएने महाराष्ट्र पोलिसांचा अपमान केला.. शिवसेनेचा हल्ला - Shiv Sena attacks BJP over Sachin Waze arrest Mumbai Police | Politics Marathi News - Sarkarnama

वाझेंना अटक करून एनआयएने महाराष्ट्र पोलिसांचा अपमान केला.. शिवसेनेचा हल्ला

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 15 मार्च 2021

महाराष्ट्रातील एखाद्या प्रकरणात नाक खुपसायला मिळते म्हटल्यावर केंद्रीय तपास यंत्रणा मागे कशा राहतील, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या "अँटिलिया' निवासस्थानासमोर स्फोटकांनी सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) काल अटक केली. वाझे यांच्या अटकेनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. आजच्या 'सामना'च्या अग्रलेखात शिवसेनेने वाझेंच्या अटकेवरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. 

"विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी विधानसभेत हे प्रकरण लावून धरले. सरकारने वाझे यांची बदली करून संपूर्ण प्रकरणाचा तपास राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाकडे दिला. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच केंद्र सरकारने ‘एनआयए’ला तपासाला पाठवले. त्याची इतक्या तातडीने गरज नव्हती, पण महाराष्ट्रातील एखाद्या प्रकरणात नाक खुपसायला मिळते म्हटल्यावर केंद्रीय तपास यंत्रणा मागे कशा राहतील?

वीस जिलेटिन कांड्यांचा व गाडी मालकाच्या संशयास्पद मृत्यूचा तपास एनआयएने हाती घेऊन लगेच वाझे यांना अटक करण्याची कर्तबगारी दाखवून दिली. वाझे यांच्या अटकेने भारतीय जनता पक्षात जे आनंदाचे भरते आले आहे त्याचे वर्णन करण्यास शब्दच अपुरे पडावेत. ‘‘वाझे यांना अटक झाली हो।।’’ असे गर्जत हे लोक रस्त्यावर यायचेच काय ते बाकी आहेत. या आनंदाचे कारण असे की, काही महिन्यांपूर्वी याच वाझे यांनी रायगड पोलिसांच्या मदतीने भाजपवाल्यांचा महंत अर्णब गोस्वामी यास अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी बेड्या ठोकल्या होत्या. त्या वेळी हे सर्व लोक गोस्वामी याच्या नावाने रडत होते व वाझे यांना शाप देत होते. ‘‘थांबा, बघून घेऊ, केंद्रात आमचीच सत्ता आहे’’, असे सांगत होते. तो मोका आता साधला," असा आरोप अग्रलेखात करण्यात आला आहे. 

"वाझे यांचे काही चुकलेच असेल व 20 जिलेटिन कांड्यांत ते गुन्हेगार असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास मुंबई पोलीस, दहशतवादविरोधी पथक सक्षम होतेच, पण केंद्रीय तपास पथकाला ते होऊ द्यायचे नव्हते. त्यांनी वाझे यांना अटक करून महाराष्ट्र पोलीस दलाचा अपमान केला आहे. हे सर्व ठरवून घडवले जात आहे. वाझे यांना अटक करून दाखवली, याचा आनंद जे व्यक्त करीत आहेत ते राज्याच्या स्वायत्ततेवर घाला घालीत आहेत. सत्य लवकरच बाहेर येईल," अशी अपेक्षा 'सामना'तून  व्यक्त केली आहे.

'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे...

  1. महाराष्ट्रात काही खुट्ट झाले की, या केंद्रीय यंत्रणा लगेच महाराष्ट्रात धाव घेतात. अलीकडे हे जणू केंद्र सरकारचे धोरणच झालेले दिसते. 
  2. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांना जमणार नाही हे केंद्र सरकार परस्पर कसे काय ठरवू शकते?
  3. सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांनी उत्तम तपास केला, तरीही केंद्राने सीबीआयला घुसवले. त्या सीबीआयने तरी काय दिवे लावले?
  4. अर्णब गोस्वामी यांना अटक करून तुरुंगात टाकल्यापासून वाझे हे भाजप आणि केंद्राच्या हिटलिस्टवर होते.
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख