मुख्यमंत्र्यांना पत्रे लिहून लेटरहेड का वाया घालवतात..

मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांसाठी काहीही विशेष उपाययोजना जाहीर केल्या नाहीत.
Banner_20_2818_1Copy_20of_20Sarkarnama_20Banner_20_2818_29_1.jpg
Banner_20_2818_1Copy_20of_20Sarkarnama_20Banner_20_2818_29_1.jpg

मुंबई  : कोरोनाकाळात जीव धोक्यात घालून जनसेवा करणाऱ्या पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर दर्जा देण्याची इच्छाच सरकारला नसेल तर दिलीप वळसे पाटील Dilip Walse Patil, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ हे मंत्री या विषयावर फक्त मुख्यमंत्र्यांना पत्रे लिहून लेटरहेड तरी का वाया घालवत आहेत, अशी खरमरीत टीका भाजप महिला मोर्चाच्या मुंबई अध्यक्ष शीतल गंभीर देसाई यांनी केली आहे. Sheetal Desai Criticism of on Mahavikas Aghadi government

माध्यमकर्मी मंडळी कोरोनाकाळातही स्वतःचा जीव  धोक्यात घालून जनसेवा करीत आहेत हे सगळ्यांनाच माहित आहे. अशा पत्रकारांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी त्यांना फ्रंटलाईन वर्कर चा दर्जा देण्याचा निर्णय देशातील अनेक राज्यांनी घेतला आहे. यापूर्वीही खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अनेक राष्ट्रप्रमुखांनी पोलिस, आरोग्य सेवक आदी फ्रंटलाईन वर्करचा उत्साह वाढविण्यासाठी अनेक प्रतीकात्मक उपाय योजले होते. पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्याची मागणी कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात आदींनी केली होती. तरीही नुकताच राज्यातील लॉकडाऊन वाढवताना आणि काही निर्बंध शिथील करताना मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांसाठी काहीही विशेष उपाययोजना जाहीर केल्या नाहीत. याबद्दल देसाई यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 

आपल्या हातात काहीही नसूनही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले होते. मात्र, कॅबिनेट मंत्र्यांनी नुसतीच मुख्यमंत्र्यांना पत्रे लिहून बोलाची कढी अन बोलाचा भात केला आहे का. हे मंत्री तोंडच्या वाफा तरी का वाया दवडतात, हा विषय त्यांनी मंत्रीमंडळ बैठकीत काढला का, चंद्रपूरला दारुबंदी उठवण्याच्या प्रस्तावाला एकमुखाने मान्यता देणाऱ्यांना या विषयावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करावीशीही वाटली नाही, म्हणजेच तोंडदेखली पत्रे पाठविणाऱ्यांचेही या विषयावर प्रत्यक्षात काय मत आहे, हेच दिसून येते. चौकशी सुरु असलेल्या पण आपल्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतर मुदतवाढ दिली नाही, म्हणून ज्येष्ठ-वरिष्ठ मंत्री थेट मुख्यमंत्र्यांना इशारे देतात, तुमच्या पक्षाच्या दोन जादा आमदारांच्या बळावर उड्या मारू नका अशी तंबी दिली जाते. मग पत्रकारांबद्दल खरेच कळवळा असेल तर हे मंत्री कॅबीनेटच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना धारेवर का धरत नाहीत, अशीही विचारणा श्रीमती देसाई यांनी केली आहे. 

एरवी शंभर कोटींची वसुली करणाऱ्यांसाठी नियमभंग करून पायघड्या घातल्या जातात, पण पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर हा दर्जा दिला जात नाही ही शोकांतिका आहे, अशी खरमरीत टीकाही देसाई यांनी केली आहे. पत्रकार मुख्यमंत्र्यांकडे पैसे मागत नाहीत की वैयक्तिक बक्षिस मागत नाहीत. केवळ कामातील श्रम हलके व्हावेत, म्हणून सामुदायिक दर्जा मागत आहेत. पत्रकारांचे शिरोमणी असलेले शिवसेना खासदार संजय राऊत देखील या विषयावर तोंडात मिठाची गुळणी धरून बसले आहेत. ज्यांनी आपल्या वडिलांकडून पत्रकारितेचे बाळकडू घेतले आहे त्या मुख्यमंत्र्यांना आपल्या घरातील वर्तमानपत्राच्या पत्रकारांबद्दलही आस्था नसेल तर इतरांनी त्यांच्याकडून कसलीही अपेक्षाच करू नये हे उत्तम, असा टोलाही देसाई यांनी लगावला आहे.
Edited by : Mangesh Mahale   
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com