शरद पवारांकडून देशमुखांची पाठराखण अन् फडणवीसांचा पलटवार

अनिल देशमुख ५ ते १५ फेब्रुवारी दरम्यान अनिल देशमुख रुग्णालयात होते. १५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान ते क्वारंटाईन होते, असे शरद पवार यांनी सांगितले.
Sharad Pawars claim was refuted by Devendra Fadnavis
Sharad Pawars claim was refuted by Devendra Fadnavis

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख आणि निलंबित सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन वाझे यांची फेब्रुवारी महिन्यात भेट झाल्याचा परमबीर सिंग यांनी केलेला दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी खोडून काढला आहे. ता. ५ ते १५ फेब्रुवारी दरम्यान देशमुख रुग्णालयात होते. तर १५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान ते क्वारंटाईन होते, असे पवार यांनी सांगितले आहे. पवारांनी केलेल्या या दाव्यानंतर भाजपने पलटवार केला आहे.

पवारांची पत्रकार परिषध सुरू असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर देशमुख यांनी १५ तारखेला पत्रकार परिषद घेतल्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ देशमुख यांच्या ट्विटर अकाऊंटवरील आहे. ''१५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, १५ ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पजत्र परिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?'', असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. 

फडणवीस यांनी त्यानंतर आणखी एक ट्विट केले असून परमबीर सिंग यांच्या पत्रावर शरद पवार यांना पुरेशी माहिती देण्यात आलेली नाही, असे म्हटले आहे. परमबीर सिंग यांच्या पत्रात नमूद केलेला एसएमएसचा पुरावाच सांगतो की, ही भेट फेब्रुवारीच्या अखेरीस झालेली आहे. आता नेमके कोण दिशाभूल करते आहे?, असे फडणवीस यांनी नमुद केले आहे. 

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही टीका केली आहे. देशमुखांनी होम क्वारंटाईनमध्ये असताना पत्रकार परिषद कशी घेतली? त्यांनी कोरोना नियमांचं उल्लंघन केले आहे. या प्रकरणात आधी सत्य बाहेर येऊ द्या, असे मुनगंटीवार म्हणाले. दरम्यान, देशमुख यांनी १५ तारखेला नागपूरच्या अॅलेक्सिस रुग्णालयात पत्रकार परिषद घेतल्याचे समजते. या दिवशी ते रुग्णालयात घरी गेले होते. 

पत्रकार परिषदेत शरद पवार काय म्हणाले?

देशमुख यांनी सचिन वाझे (Sachin Waze) यांना मुंबईतल्या रेस्टाॅरंट्स, डान्स बारमधून महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते, असा दावा परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी आपल्या पत्रात केला होता. त्यावरुन राजकीय धुरळा उडाला आहे. विरोधी पक्ष देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यावर आज पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची पाठराखण केली. पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन लेटरबाँब प्रकरणात रिबेरोंसारख्या अधिकाऱ्याकडून चौकशी व्हावी, असे काल सूचित केले होते. 

याबाबत आज बोलताना पवार म्हणाले की ५ ते १५ फेब्रुवारी दरम्यान अनिल देशमुख रुग्णालयात होते. १५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान ते क्वारंटाईन होते. त्यामुळे परमबीर सिंग म्हणतात तशी वाझे व देशमुख यांची भेटच झाली नाही. परमबीर सिंग महिनाभर शांत का बसले असा सवालही पवार यांनी उपस्थित केला. ज्या काळासाठीचा हा आरोप होता त्या काळातले अनिल देशमुखांचे सर्व कार्यक्रम मी पाहिले आहेत. जयंत पाटीलही अधिक माहिती घेऊन मला भेटले. सर्व माहिती मी तपासली आहे, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.मनसुख हिरेन यांची हत्या कोणी केली हे आज ना उद्या उघड होणारच आहे. एटीएसचा तपास योग्य पद्धतीने सुरु आहे, असेही पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com