कोरोना काळातील राजेश टोपेंचे काम कौतुकास्पद : शरद पवार  - Sharad Pawar said Health Minister Rajesh Tope good work in Corona | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना काळातील राजेश टोपेंचे काम कौतुकास्पद : शरद पवार 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 10 जून 2021

राजकारणात नव्या पिढीला प्रोत्साहन आणि संधी दिली पाहिजे. उत्तम काम करत असेल तर पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे पवारांनी यावेळी सांगितले.

मुंबई : देशामध्येच नाही तर संपुर्ण जगामध्ये कोरोनाचे संकट निर्माण झाले. पण महाराष्ट्रामध्ये आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य खात्याने चांगले काम केले. आणि सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजेश टोपे यांचे कौतुक केले. (Sharad Pawar said Health Minister Rajesh Tope good work in Corona) 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ncp) २२ व्या वर्धापन दिनानिमित्त शरद पवार  (Sharad Pawar) यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पवार म्हणाले. जनतेला विश्वास देण्याचे काम राष्ट्रवादीने केले आहे. मंत्रीमंळातील अनेक जण नवी जबाबदारी पार पाडण्यात यशस्वी होत आहेत. आरोग्य खात्याने चांगले काम केले आणि त्याचा परिणाम कोरोनाच्या (Covid-19) सगळ्या संकटातून बाहेर पडू शकतो, असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला. अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, राजेश टोपे अशा प्रत्येकाने आपली जबाबादारी चांगल्याप्रकारे पार पाडली. महाराष्ट्राला नेतृत्वाची फळी देऊन विश्वास देण्याचे काम राष्ट्रवादीने केले. राजकारणात नव्या पिढीला प्रोत्साहन आणि संधी दिली पाहिजे. उत्तम काम करत असेल तर पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे पवारांनी यावेळी सांगितले. 

हे ही वाचा : जितिन प्रसाद यांच्यावर मोठी जबाबदारी; योगींनी दिले संकेत

कोरोना संकटातून बाहेर पडताना अनेक उपक्रम राबण्यात आले. शिवभोजन थाळीचा उपक्रम राबवण्यासंबंधी चर्चा झाली तेव्हा माझ्याही मनात शंका होती. पण ते काम अतिशय चांगल्या प्रकारे सुरु आहे, असेही पवार म्हणाले. संकटात आपण थांबलो नाही. तर कोरोनाला सामोरे गेलो. असे सांगत शरद पवारांनी आपल्याला राष्ट्रवादीच्या भवितव्याची चिंता नसल्याचे स्पष्ट केले. 

शिवसेनेसारखा विश्वासू पक्ष नाही

शिवसेनेसोबत आपण याआधी कधी काम केले नाही. मात्र, महाराष्ट्र शिवसेनेलासुद्धा कित्येक वर्षांपासून पाहत आहे. माझा यासंबंधीचा अनुभव विश्वास असणाराच आहे. ज्यावेळी जनता पक्षाचे सरकार आले त्यानंतरच्या कालखंडात निवडणुकीत सगळीकडे काँग्रेसचा पराभव झाला मात्र, काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला….तो म्हणजे शिवसेना. नुसते पुढे आले नाहीत तर या निवडणुकीत इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी शिवसेना विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा करणार नाही असा निर्णय घेतला. पक्षाचा नेता असा निर्णय घेतो पण त्याची चिंता कधी बाळासाहेबांनी केली नाही. त्यांनी इंदिरा गांधींना दिलेला शब्द निवडणूक न लढवता पाळला, असे पवारांनी सांगितले. 

हे ही वाचा :  केंद्रीय कृषिमंत्री शेतकऱ्यांशी चर्चेस तयार पण एका अटीवर...

त्यामुळे कोणी काहीही शंका घेतली तरी शिवेसनेने १९७७ मध्ये भक्कमपणाची भूमिका घेतली तीच भूमिका सोडण्यासंबंधी कोणी सांगत असेल तर तसे होणार नाही, असे शरद पवार म्हणाले. हे सरकार टीकेल आणि पाच वर्ष काम करेल. नुसतेच काम करणार नाही तर लोकसभा आणि विधानसभेत एकत्रित काम करुन सामान्य जनतेचे देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करण्याचे काम करेल याबाबत शंका नसल्याचे पवार म्हणाले.  

Edited By - Amol Jaybhaye  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख