भास्कर जाधव यांच्या फुग्याला शरद पवारांकडूनच टाचणी - Sharad Pawar pin the balloon of Bhaskar Jadhav | Politics Marathi News - Sarkarnama

भास्कर जाधव यांच्या फुग्याला शरद पवारांकडूनच टाचणी

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 11 जुलै 2021

शिवसेनेचे मनसुबे उधळले... 

मुंबई  : महाविकास आघाडीच्या राजकारणात (Mahavikas Aghadi) कोणतीही बाब सरळ होत नसते. सत्ता टिकवतानाच आपला सहकारी मित्रपक्ष डोईजड होणार नाही, याची काळजी तीनही पक्ष घेत असतात. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिवसेनेचे भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी ताकिला अध्यक्ष म्हणून चांगली कामगिरी केली. त्यामुळे त्यांना आणि शिवसेनेला हे पद किती महत्वाचे आहे, हे कळाले. मात्र या त्यांच्या इच्छेच्या फुग्याला काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीनेही टाचणी टोचली आहे. ही टाचणी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काॅंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी टोचल्याने शिवसेनेची अवस्था कोणाला सांगताही येत नाही, अशी झाली आहे.

विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीत आपल्या आमदाराला बसविण्याच्या शिवसेनेच्या मनसुब्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि दोन्ही काँग्रेसने ‘ब्रेक’ लावला असून, सत्तावाटपाच्या वाटाघाटींकडे बोट दाखवून, हे पद काँग्रेसकडेच राहणार असल्याचे पुन्हा एकदा सांगितले. एवढेच नाही; तर सत्तेत शिवसेनेची विशेषत: मुख्यमंत्री ठाकरे यांची महत्त्वाकांक्षा वाढू नये म्हणूनच अध्यक्षपदाच्या चर्चेपासून खुद्द पवार लक्ष घालत असल्याचे अधोरेखित झाले आहे.

वाचा ही बातमी : पंकजांना नाराजीमुळे खास निमंत्रण नाही... 

अमित शहांनी सांगितले नेत्यांचे तीन प्रकार

याआधी चर्चा पोकळ असल्याचे सांगत अध्यक्षपदाबाबत तडजोड करणार नसल्याचे काँग्रेसने जाहीर केले. परिणामी, या मुद्यावरून आघाडीत नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिवसेनेचे आमदार आणि तालिकाध्यक्ष भास्कर जाधव यांनी भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांना निलंबित केल्यानंतर शिवसेना आणि पर्यायाने जाधव चर्चेत आले आहेत. विरोधकांना योग्य वेळी धडा शिकविल्याचे कौतुक होऊ लागल्यानंतर रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदासाठी जाधव यांच्या नावाची चर्चा रंगली. अर्थात, या पदावर दावा करतानाच आपल्याकडील वन खाते काँग्रेसला देण्याची तयारी असल्याचे वातावरण शिवसेनेच्या गोटातूनच तयार केले गेले. त्यानंतर सत्तावाटपाच्या सूत्रात बदल होऊ शकतो, हे शिवसेनेकडून सूचित करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यावरून आघाडीच्या घटकपक्षांत प्रामुख्याने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांत अस्वस्थता पसरली. त्यातून अध्यक्षपदावर काँग्रेसचाच हक्क असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले. विधानसभा अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे असल्याचे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शिवसेनेला एकप्रकारे फटकारले.

जाधव यांना रोखण्याची खेळी
अध्यक्षपदावर दावा करताना त्यासाठी आमदार भास्कर जाधव यांचे नाव पुढे केले गेले. मुळात, विधानसभा निवडणुकीच्या आधी जाधव यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केल्याने पवार त्यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे जाधव यांना मंत्रीपदही मिळालेले नसल्याचे राजकीय जाणकार सांगतात, त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदासाठी जाधव यांचे नाव चर्चेत येताच पवार यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवून शिवसेनेला रोखल्याचे बोले जात आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख