संजय राठोडांना एक न्याय आणि धनंजय मुंडेना दुसरा का? : सेना नेत्यांचा सवाल

उद्धव ठाकरे यांनी राठोड यांना अद्याप भेट दिली नसल्याची माहिती
sanjay rathod-dhananjay munde
sanjay rathod-dhananjay munde

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावरील आरोप तसेच कोविडकाळात त्यांनी केलेले नियमांचे उल्लंघन या अत्यंत अयोग्य बाबी असल्याचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे झाले असल्याचे विश्वसनीयरित्या समजते. मात्र शिवसेनेच्या मंत्र्याला केवळ संशयावरून पायउतार व्हावे लागत असेल तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या धनंजय मुंडे यांना वेगळा न्याय का, असा प्रश्न उपस्थित होईल याकडे सेनेतील काही ज्येष्ठ मंत्र्यांनी लक्ष वेधले.

राठोड यांचे वागणे पटले नसले तरी पुढे काय याबद्दल अद्याप मुख्यमंत्री ठाकरे यांनी निर्णय घेतलेला नाही. राठोड यांनी गेले काही दिवस सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न केला पण मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतरच्या भेटीशिवाय उद्धव ठाकरे यांनी त्यांना भेटीची वेळ दिलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी वेळ न देणे हे पुरेसे बोलके मानले जाते आहे.

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे हे त्यांच्या विश्वासू मंत्र्यांसोबत या संदर्भात पुन्हा एकदा चर्चा करणार आहेत असेही समजते. या दरम्यान राठोड स्वत:हून पायउतार होतील तर बरे असेही सांगितले जाते. दरम्यान सेनेच्या मंत्र्यांनी तसेच शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी एका पिडीतेने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले असतानाही त्यांना पाठीशी घातले जाते आहे याकडे लक्ष वेधले गेले.

राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक

राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आता आक्रमक भूमिका घेतली असून अधिवेशन होऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे. भाजपच्या महिला मोर्चातर्फे आज राज्यभर त्यासाठी आंदोलन करण्यात आहे. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आणि या प्रकरणात पोलिस दबावाखाली असल्याचा आरोप केले. त्यात त्यांचे पती किशोर वाघ यांच्यावर अपसंपदा जमा केल्याबद्दल गुन्हा दाखल झाल्याने दोन्ही बाजूंनी राजकीय वातावरण पेटले आहे. विधीमंडळाचे अधिवेशन येत्या एक मार्चपासून त्या आधीच राठोड यांना अभय मिळणार की त्यांना पदावरून जावे लागणार, याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com