कृषी कायद्यासंदर्भात केंद्राचा अहंकार नसेल, तर हा कसा अहंकार होऊ शकतो  - Sanjay Raut's explanation regarding the denial of the plane to Governor Bhagat Singh Koshyari | Politics Marathi News - Sarkarnama

कृषी कायद्यासंदर्भात केंद्राचा अहंकार नसेल, तर हा कसा अहंकार होऊ शकतो 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

....हा सर्वात मोठा राज्यघटनेचा आणि लोकशाहीचा अपमान आहे.

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांना त्याच्या स्वराज्यात जाण्यासाठी नियमानुसार विमान नाकारण्यामागं अहंकराचा प्रश्‍न येतोच कुठे? नियमांचं पालन करणे म्हणजे अहंकार आहे का? कृषी कायद्यासंदर्भात केंद्रातील सरकार ज्या पद्धतीने वागत आहे, ते जर निमयांचे पालन आहे, तो अहंकार नाही. तर मग राज्यपालांना फक्त नियमानुसार विमान मिळालं नाही, तर हा अहंकार कसा होऊ शकतो आणि सरकारने कायदा पाळायचाच नाही का?, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. 

राज्यापल कोश्‍यारी यांना उत्तराखंडला जाण्यासाठी राज्य सरकारकडून विमान नाकारण्यात आले. त्यानंतर राज्यातील भाजप नेत्यांनी महाविकास सरकारवर जोरदार टिका करायला सुरुवात केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी "आतापर्यंतचं सर्वात अहंकारी सरकार आहे,' असं म्हटलं आहे. त्यावर खासदार राऊत यांनी दिल्लीत वरील प्रश्‍न विचारला. 

"राज्य सरकाने निमयमांचे पालन केले. व्यक्तीगत अथवा खासगी कामासाठी सरकारी यंत्रणा कोणालाही वापरता येणार नाही. ती मुख्यमंत्र्यांनाही वापरता येणार नाही.'' ...मग, परवानागी नसताना राज्यपाल विमानात जाऊन बसले का? या प्रश्‍नावर "हे भाजपचे नेतेच सांगू शकतील. कारण, त्यांना याबाबत जास्त माहीत आहे. मला एवढंच माहीत आहे की, राज्यपालपदाचा सन्मान राखण्याचे काम आम्ही करत असतो. पण, लोकनियुक्त सरकारचा आदर राज्यपाल किती राखतात, हे मात्र मला माहीत नाही,' असे राऊत म्हणाले. 

"कोविडच्या काळात खासगी विमान असुरक्षित आहे, असे कोणी सांगितले. कोविडचा विषय असेल तर राज्यपालांनी राज्याबाहेरच पडणंच चुकीचं आहे. त्यांचे वय पाहता त्यांनी राज्यभवनात सुरक्षित राहणे गरजेचे आहे,'' असे राऊत म्हणाले. हा घटनेचा अपमान आहे, असा आरोप भाजपकडून होत आहे. यावर राऊत यांनी राज्यपाल कोश्‍यारी यांच्यावर आरोप करत भाजपला प्रश्‍न केला. ""खरं म्हणजे बारा आमदारांच्या नियुक्‍त्या मंत्रिमंडळ आणि सरकारने शिफारस करूनसुद्धा राज्यपाल करत नसतील, तर हा सर्वात मोठा राज्यघटनेचा आणि लोकशाहीचा अपमान आहे. यावर विरोधी पक्ष भाजपने बोललं पाहिजे.'' 

...तर भाजपनं आपलं विमान राज्यपालांना द्यायला हवं होतं 

राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांना विमान नाकारण्याच्या प्रकरणाशी भाजपचा काय संबंध आहे. भाजपला एवढंच वाईट होते, तर भाजपने त्यांचं विमान राज्यपालांना द्यायला पाहिजे होते. भाजपकडे खूप कर्मिशयल विमानं आहेत. कोश्‍यारीसाहेब हे भाजपचेच नेते आहेत. अलीकडे राजभवनामध्ये राज्यापेक्षा भाजपचीच पक्षकार्ये जास्त चालतात, अशी लोकांची भावना आहे. राज्यपालांचा अपमान व्हावा, अशा प्रकारचं कोणतंही काम राज्य सरकार अणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार नाहीत आणि त्यांनी ते केलं नाही, अशा शब्दांत कोश्‍यारी यांना डेहराडूनला जाण्यासाठी राज्य सरकारने विमान नाकारल्याच्या प्रकरणावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख