ही भेट शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची होती काय? - Sanjay Raut Devendra Fadnavis Meat | Politics Marathi News - Sarkarnama

ही भेट शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची होती काय?

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला, त्यामध्ये त्यांनी पश्चिम बंगालला महामार्गांच्या कामासाठी तब्बल 25 हजार कोटी रुपयांची घोषणा केली. त्यावरुन राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या लेकीचा साखरपुडा रविवारी पार पडला. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांची गळाभेट घेतली. याची चर्चा राज्यभरात सुरु होती. त्यावर राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, 'ही भेट काय, शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची होती काय', असा सवाल करत राऊत म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात सगळेच एकमेकांना भेटत असतात. त्यामध्ये नवीन काय आहे.

अर्थसंकल्पावर राऊत म्हणाले. 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला, त्यामध्ये त्यांनी पश्चिम बंगालला महामार्गांच्या कामासाठी तब्बल 25 हजार कोटी रुपयांची घोषणा केली. त्यावरुन राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. अर्थसंकल्प देशाचा आहे की, एखाद्या राजकीय पार्टीचा आहे. काही राज्याच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून निधी वाटपाचा कार्यक्रम सुरु आहे का? बजेटचा डोलारा महराष्ट्रावर अवलंबून आहे. पण महाराष्ट्राची निराशा करणारा अर्थसंकल्प आहे. खिशात नाही दाना आणि बाजीराव म्हणा, असे हे दिल्लीतील बाजीराव आहेत, असा टोला राऊत यांनी लगावला.  

अर्थसंकल्पात थापा मारणे बंद करायला हवे, नाशिक व नागपुरात भाजपची सत्ता असल्यानं मेट्रोसाठी निधी दिला, हे पटणारं नाही. यापुढं त्या शहरात त्यांची सत्ता राहणार नाही. मुंबईची मेट्रो का अडकून ठेवलीय ? जमीन केंद्राची आहे म्हणतात. कुठून मंगळावरून जमीन आणलीय का? असा प्रश्न राऊत यांनी केला. 

पश्चिम बंगालसाठी २५ हजार कोटी रुपयांच्या निधीची घोषणा

पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तेथील महामार्गांच्या कामासाठी तब्बल 25 हजार कोटी रुपयांची घोषणा केली. सुमारे 675 किलोमीटर लांबीची रस्तेबांधणी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तामिळनाडू आणि आसाममध्ये होणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी भरीव निधीची घोषणा केली आहे. 

 निर्मला सीतारामन यांनी आज सकाळी अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींची भेट घेतली. त्यानंतर केंद्रीय मंत्रीमंडळाने अर्थसंकल्पाला मंजूरी दिली. हा अर्थसंकल्प एका अभूतपूर्व परिस्थितीनंतर मांडला जात असल्याचे सांगत सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली आहे. देशातील काही राज्यांमध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या राज्यांसाठी अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद केली जाण्याची शक्यता होती. त्यानुसार अर्थमंत्र्यांकडून या राज्यांसाठी विविध घोषणा केल्या जात आहेत. 

प्रामुख्याने पश्चिम बंगालची निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. राज्यातील महामार्ग व रस्त्यांच्या कामांसाठी 25 हजार कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. आसामध्येही 19 हजार कोटी रुपये तरतुदीची रस्त्यांची काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Edited By - Amol Jaybhaye    

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख