sanjay raut bows down in front of governor Bhagatsinh koshiyari | Sarkarnama

संजय राऊतांनी राज्यपालांना असा नमस्कार केला की हेच का ते राऊत, असा प्रश्न पडावा!

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 23 मे 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर निवड होत नव्हती तेव्हा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज्यपालांवर जोरदार प्रहार केले होते. आता मात्र राज्यपाल आणि शिवसेनेत दरी नसल्याचे निर्वाळा त्यांची भेट घेऊन राऊतांनी दिला. 

मुंबई : राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा होऊ नये, असे म्हणत आणि मला मूर्ख रामलाल या राज्यपालाची आठवण येते आहे, असे सांगत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज खुद्द राजभवनवर जाऊन कोश्यारी यांची भेट घेतली. भेट घेताना राऊत यांनी राज्यपालांना कंबरेतून वाकत नमस्कार घातला. विशेष म्हणजे राऊत यांचा हाच फोटो राजभननने ट्विट केला.

या भेटीविषयी संजय राऊत म्हणाले की, "राज्यपाल आमचे मार्गदर्शक आहेत. खूप दिवस त्यांना मी व्यक्तिश: भेटलो नव्हतो. ही केवळ सदिच्छा भेट होती. यापलिकडे काही नाही. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध अत्यंत मधुर आहेत. दोघांना एकमेकांविषयी प्रेम आणि आदर आहे. मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचे संबंध जसे पिता-पुत्राचे असावेत तसेच आहेत. दऱ्या वगैरे आमच्यात पडत नाही."

राज्यपाल आणि शिवसेना यांचे संबंध हे महाआघाडी सरकार स्थापनेपासूनच थोडे ताणलेले होते. त्यात उद्धव ठाकरे यांच्या सरकारने राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवरील नियुक्तीसाठीची दोन नावे राज्यपालांनी स्वीकारली नाही. खुद्द ठाकरे यांचेही नाव त्यांनी स्वीकारले नाही. त्यामुळे ठाकरे हे विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून जाणार की नाही, अशी शंका निर्माण झाली होती. तेव्हा गेल्या महिन्यात राऊत यांनी कोश्यारी यांच्यावर बाण चालवले होते. ते बाण इतके जहरी होते की भाजपला राज्यपालांच्या बाजूने उतरावे लागले होते. `राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है!`, असे शब्द राऊत यांनी वापरले होते. 

त्यानंतर राज्यपालांनी विधान परिषदेची निवडणूक तातडीने घेण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आणि ठाकरे हे बिनविरोध आमदार झाले. आमदार झाल्यानंतर ठाकरे हे राज्यपालांना जाऊन भेटले. मात्र कोरोनाच्या साथीच्या मुकाबल्यासाठी राज्य सरकार काहीच करत नसल्याची तक्रार करत भाजपचे नेेते राज्यपालांना भेटले. त्यानंतरही पुन्हा शिवसेनेने भाजपच्या नेत्यांना राजभवनातच खोली घेण्याचा सल्ला दिला. राज्यपालांनी कोरोनाच्या परिस्थितीवर राज्य सरकार काय काम करत आहे, याची माहिती घेण्यासाठी तीन दिवसांपूर्वी बैठक बोलविली. मात्र या बैठकीला मुख्यमंत्री ठाकरे गेले नाहीत. त्यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर मात्र या बैठकीला उपस्थित होते. या साऱ्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी राज्यपालांना भेटून आपले संबंध उत्तम असल्याचा निर्वाळा दिला. 

वाचा आधीच्या बातम्या : संजय राऊत यांना निर्लज्ज राज्यपाल रामलाल यांची आठवण का झाली?

राज्यपालांवर टीका करून संजय राऊतांना काय सुचवायचंय?

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख