Sanjay Raut on backfoot as he did not anticipate move of Sena on Parner defection | Sarkarnama

सेनेचे नगरसेवक अजितदादांनी पळविले नाहीत, असे म्हणणारे संजय राऊत `बॅकफूट`वर 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 8 जुलै 2020

हा स्थानिक विषय म्हणून राऊतांनी सोडले तरी शिवसेना नेतृत्त्वाने सोडले नव्हते. 

मुंबई : पारनेर प्रकरणावरून निर्माण झालेला महाविकास आघाडीतला तिढा अखेर मिटला.  शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले ते पाच नगरसेवक पाच दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी परत पाठवले आहेत. मात्र हा स्थानिक विषय म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत मात्र बॅकफूटवर गेले आहेत. शिवसेना या प्रश्नी इतकी ठाम आहे, याची कल्पना राऊत यांना होती की नाही, याची शंका राउत यांनी या प्रकरणी विधाने पाहिल्यानंतर येते. 

पारनेर प्रकरणी शिवसेनेत अस्वस्थता होती. पाच जुलै रोजी हा प्रवेश झाला होता. त्यानंतर दोनच दिवसांत मिलिंद नार्वेकर यांनी अजितदादांना फोन केल्याची चर्चा होती. त्यावर काल (मंगळवारी) याबाबत संजय राऊत यांना विचारले असता मातोश्रीवरून नगरसेवक परत द्या म्हणून, असा कोणताही फोन गेला नव्हता, असे स्पष्टीकरण दिले होते. तसेच हे नगरसेवक अजित पवारांनी पळविले, असे म्हणता येत नाही, अशीही सारवासारव केली होती. तरी शिवसेनेचे नेतृत्त्व या प्रवेशाच्या विरोधात ठाम राहिले आणि ते रद्द करण्याचा हेका सोडला नाही. 
 
ठाकरे यांचे दूत सेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना आज अजितदादांनी मंत्रालयात बोलावून घेतले अन आमदार लंके यांच्या उपस्थितीत ते पाच नगरसेवक हजर झाले. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे या पाच नगरसेवकांना घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मातोश्रीवर भेटले. निलेश लंके हे आधी शिवसेनेतच होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी ते राष्ट्रवादीत आले. त्यांच्या पत्नी या शिवसेनेत असून त्या नगर जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. 

पाच दिवसांपूर्वी शिवसेनेचे हे पाच नगरसेवक पक्षाचे माजी  आमदार विजय औटी यांच्यावर नाराज होत ते राष्ट्रवादीत गेले. या प्रवेशाच्या वेळी अजित पवार हजर होते. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील नेते एकमेकांचे कार्यकर्ते पळवत असल्याचे चित्र होते. पारनेर प्रकरण काही महत्त्वाचे नाही, असे शरद पवार आणि संजय राऊत सांगत होते. तरी शिवसेनेत त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. मिलिंद नार्वेकर यांनी सोमवारी अजित पवार यांना फोन करून हे नगरसेवक परत देण्याची मागणी करत होते. पारनेरचा विषय राष्ट्रीय किंवा राज्याचा नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पुण्यात दिली होती. त्यानंतर लगेच या हालचाली घडल्या. पारनेर नगरपंचायतीची पुढील दोन महिन्यांत निवडणूक होण्याची शक्यता आहे. 

महाविकास आघाडी ही एकसंघ आघाडी असून नगरसेवकांचे परत जाणे हा कुणाचाही विजय किंवा पराजय नाही तर ती एकपणाची खूण असल्याची प्रतिक्रीया आहे असे दोन्ही पक्षांचे नेते सांगत आहेत. स्थानिक नेते माजी आमदार विजय अौटी यांच्यावर नाराज झाल्यामुळे हे पक्षांतर झाले होते असे लंके यांनी सांगितले. दोन्ही पक्षांत एकवाक्यता रहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे एकत्र आहेत. मिलिंद नार्वेकर यांची शिष्टाई यशस्वी झाल्याची चर्चा आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख