संजय राठोड यांचे शक्तीप्रदर्शन : पोहरादेवी येथे दाखल, समर्थकांची गर्दी - Sanjay Rathores shows strength at Pohardevi with crowd of supporters | Politics Marathi News - Sarkarnama

संजय राठोड यांचे शक्तीप्रदर्शन : पोहरादेवी येथे दाखल, समर्थकांची गर्दी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

पोहरादेवी येथे संजय राठोड कुटूंबासह दाखल झाले असून समर्थकांनी प्रचंड गर्दी केली आहे.

यवतमाळ : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड आज अखेर समोर आले. पोहरादेवी येथे ते कुटूंबासह दाखल झाले असून समर्थकांनी प्रचंड गर्दी केली आहे. त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. 

परळी येथील टिकटॉक गर्ल पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर ते जनतेसमोर कधी येतात, याची प्रतीक्षा सर्वांनाच लागली होती. अखेर आज ते समोर आले आहेत. मागील दोन दिवसांपासून ते यवतमाळातच होते. खासगी वाहनाने ते पोहरादेवी येथे काही वेळापूर्वीच दाखल झाले आहेत. समर्थकांनी याठिकाणी मोठी गर्दी केल्याने त्यांना वाट काढणेही कठीण झाले होते. याठिकाणी राठोड यांनी कुटूंबासह जगदंबा मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर सेवालाल महाराज समाधीचेही त्यांनी दर्शन घेतले. 

दरम्यान, संजय राठोड यांचा जाहीर केलेला शासकीय दौरा पुढीप्रमाणे आहे. वनमंत्री राठोड सकाळी 9 वाजता श्रीक्षेत्र पोहोरादेवी येथे शासकीय वाहनाने आर्णी, दिग्रस मार्गे जाणार आहेत. सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र पोहोरागड येथे आगमन व भेट. दुपारी 1 वाजता दारव्हा तालुक्यातील धामणगाव (देव) येथील मुंगसाजी महाराज मंदिरात दर्शन. दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यलयात कोरोनाचा आढावा घेतील. हा त्यांचा शासकीय दौरा असला तरी त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक व कुटुंबीय राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात त्यांच्या नावाची चर्चा झाल्यानंतर ते प्रथम सार्वजनिकरित्या जनतेसमोर येत आहेत. पोहोरदेवी येथे त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने जमणार असल्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख