Breaking : संजय राठोडांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सोपवला राजीनामा 

संजय राठोड दुपारी 2. 30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवास्थानी गेले होते.
 Sanjay Rathore, Uddhav Thackeray .jpg
Sanjay Rathore, Uddhav Thackeray .jpg

मुंबई : टीकटाॅक स्टार पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात अडचणीत आलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पदाचा राजीनामा सोपवला. यावेळी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते. 

संजय राठोड दुपारी 2. 30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवास्थानी गेले होते. या वेळी राठोड आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि शिंदे यांच्यात चर्चा झाली होती. या चर्चेनंतर राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला. 

पूजा चव्हाण मृत्युप्रकरणात राठोड यांच्याकडे संशयाची सुई वळली होती. या प्रकरणावरुन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने रान उठवले होते. राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांच्याकडून जोरदारपणे केली होती. विधीमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून (ता. १ मार्च) सुरु होत असल्यामुळे सरकारला कोंडीत पकडणार असल्याचे विरोधकांनी सांगितले होते. राठोडांचा राजीनामा न घेतल्यास अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. त्यामुळे राठोड यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी राठोड यांना 'वर्षा' बंगल्यावर बोलावून घेण्यात आले होते. तरुणीच्या मृत्यू प्रकरणावरून उठलेले वादळ आणि कडक लॉकडाऊनच्या काळात पोहरादेवी मंदिरात केलेली गर्दी लक्षात घेता 'आता पायउतार व्हा', असे त्यांना सांगण्यात आले होते.  

दरम्यान, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वन राज्यमंत्री राठोड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा अटळ असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी केलेल्या ट्वीटवरुन पुढे आले होते. सिंहासनाधिष्ठीत छत्रपती शिवरायांच्या हातातील हा राजदंड काय सांगतो? महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन....असे सूचक ट्वीट राऊत यांनी केले होते.

राठोड यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे मानणारा एक गट खुद्द शिवसेनेतही होता. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी संजय राठोड यांच्यावरील आरोप तसेच कोविडकाळात त्यांनी केलेले नियमांचे उल्लंघन या अत्यंत अयोग्य बाबी असल्याचे मत खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे झाले होते, असे सांगण्यात येत होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com