मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण वनमंत्री संजय राठोड यांना चांगलेच भोवणार असल्याचे दिसते. ते आपल्या पदाचा लवकरच राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावरील दबाव वाढला आहे. त्यामुळे त्यांनी राठोड यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचे वृत्त आहे.
पूजा इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पडल्याने मागील आठवड्यात (ता. ८ फेब्रुवारी) तिचा मृत्य झाला. महम्मदवाडी परिसरातील हेवन पार्क सोसायटीतील फ्लॅटमधअये पूजा हि तिचा भाऊ आणि भावाचा मित्र यांच्यासोबत राहत होती. या प्रकरणामध्ये वनमंत्री व शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव समोर आले आहे. या प्रकरणाशी संबंधित काही अॉडिओ क्लिप समोर आल्या असून त्यातील आवाज राठोड यांचाच असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला आहे.
पूजाच्या मृत्यूला राठोडच कारणीभूत असल्याने त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. अद्याप पोलिस तपासातून काहीच उलगडा झालेला नाही. या प्रकरणावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावरील दबावही वाढला आहे. राठोड या पूजाच्या मृत्यूनंतर गायब झाले आहेत. त्यांचा फोनही नॉट रिचेबल आहे. त्यामुळे त्यांच्यावरील संशयाचे सावट गडद झाले आहे. परिणामी, त्यांचा राजीनामा घेण्यासाठी शिवसेनेवर दबाव वाढला आहे.
काही वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, राठोड हे लवकरच राजीनामा देण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांना त्यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचे वृत्त आहे. आज शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचीही बैठक होणार असून त्यामध्ये यावर शिक्कामोर्तब केले जाऊ शकते. राठोड यांच्याकडूनही राजीनामा देण्याची तयारी असल्याचे समजते.
पोलिस तपास अद्याप सुरू...
मूळ परळी वैजनाथ येथील असलेली पूजा ही स्पोकन इंग्रजीच्या क्लाससाठी पुण्यात महिनाभरापूर्वी आल्याचे पोलिसांनी सांगितले होते. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ती गॅलरीतून पडली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. तिचा भाऊ विलास चव्हाण व अरूण राठोड यांनी तिला तेव्हा तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला.
पोलिसांच्या दाव्यानुसार तिच्या आईवडिलांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. मात्र ती काही गंभीर आजाराने त्रस्त असल्याने तिने उडी मारली असावी, असा पोलिसांना जबाब देण्यात आला. सुरवातीपासून तिची आत्महत्या म्हणून सर्वत्र चर्चा आहे. पण पोलिसांनी कायदेशीरदृष्ट्या आत्महत्या म्हणून शिक्कामोर्तब केलेले नाही आणि ते प्रकरण बंदही केलेले नाही.
या क्लिपमध्ये एक मंत्री आणि त्याचा कार्यकर्ता यांचे संभाषण असल्याचे बोलले जात आहे. पूजा चव्हाणचा मोबाईल ताब्यात घे, असे या संभाषणात कथित मंत्री त्या कार्यकर्त्याला सांगत असल्याचे ऐकू येत आहे. हा मोबाईल हॅंडसेट पोलिसांना तपासात मिळाला का, अशी विचारणा लगड यांना केली असता तो सापडला होता. मात्र तिच्या घरच्यांकडे तो सुपूर्त केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आधी टिकटाॅकवर आणि नंतर फेसबुकवर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह असलेल्या पूजाचा मोबाईल या प्रकरणात महत्वाची भूमिका बजावू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तो पोलिसांनी तिच्या घरच्यांकडे लगेच सुपूर्त केल्याने त्यातील `डाटा`चे पुढे काय होणार, याची शंका नाही का, याबाबत लगड म्हणाले की आम्ही संबंधितांना पुन्हा जबाबासाठी बोलवून घेणार आहोत. तेव्हा आणखी काही बाबी स्पष्ट होतील.
Edited By Rajanand More

