मिठागरांच्या जमिनी म्हणजे शिवसेना शाखा नाही : आशिष शेलारांचे शिवसेनेच्या जखमेवर मीठ - Salt lands are not branches of Shiv Sena criticizes Ashish Shelar | Politics Marathi News - Sarkarnama

मिठागरांच्या जमिनी म्हणजे शिवसेना शाखा नाही : आशिष शेलारांचे शिवसेनेच्या जखमेवर मीठ

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

यासाठी केंद्राने नेमलेल्या मंत्रीगटावर ज्येष्ठ नेते शरद पवारही होते, त्यांचा सल्ला राज्य सरकारने याबाबतीत घ्यावा, अशी शेलार यांची सूचना

मुंबई : कांजूरमार्गची जमीन नावावर करण्यापूर्वी मिठागर आयुक्तांची परवानगी न घेऊन राज्य सरकारने फाटक्यात पाय घातला आहे, आता केंद्राला दोष देऊन उपयोग नाही. मिठागरांच्या जमिनी म्हणजे शिवसेना शाखा नाही, त्या निर्णयांचे देशभरातील मिठागरांवर परिणाम होतील. बिल्डरांना रॅकेट करण्यासाठी मोठी संधी मिळेल. तरीही फक्त केंद्राकडे बोट दाखवून भावनात्मक खेळ करण्यासाठी हे सर्व चालले आहे, अशी जळजळीत टीका भाजप नेते आमदार आशीष शेलार यांनी केली.

मेट्रो कारशेडसाठी सरकारने निश्चित केलेली कांजूरमार्गची मिठागरांची जमीन केंद्र सरकारच्या मालकीची आहे, असा फलक आज तेथे लावण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे नवा केंद्र राज्य वाद उद्भवण्याची चिन्हे आहेत, यासंदर्भात शेलार यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

या निर्णयात जरी राज्य सरकारची चूक असली तरी जनहितासाठी केंद्राने काही सवलत द्यावी का, असे विचारल्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मिठागरांच्या जमिनींसंदर्भात केंद्राने सवलत का म्हणून द्यावी, यासंदर्भातील निर्णय प्रक्रिया बारा ते पंधरा वर्षे सुरु आहे. यासाठी केंद्राने नेमलेल्या मंत्रीगटावर ज्येष्ठ नेते शरद पवारही होते, त्यांचा सल्ला राज्य सरकारने याबाबतीत घ्यावा. असे अनेक मंत्रीगट नेमूनही अद्याप याबाबत निर्णय झाला नाही. या जमिनी नावावर करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आहेत, काही निर्णय घेतल्यास देशभरातील मिठागर जमिनींवर परिणाम होतील. त्यामुळे केंद्र अशी सवलत देऊ शकत नाही, ही काही शिवसेना शाखेची जमीन नाही, असाही टोला शेलार यांनी लगावला.

राज्याने मिठागर आयुक्तांच्या संमतीशिवाय अशा जमिनी परस्पर नावावर केल्या तर बिल्डरांना मोठे रॅकेट करण्यासाठी मोकळे रान मिळेल. पण राज्य सरकार मुद्दाम भावनात्मक खेळ करण्यासाठी असे करत आहे. म्हणजे मेट्रो प्रकल्पाला उशीर का झाला असे कोणी विचारले तर केंद्राकडे बोट दाखवून मोकळे व्हायचे, असा सरकारचा डावा आहे. पूर्ण माहिती असताना केलेल्या या चुका आहेत, आम्ही हे तेव्हाही निदर्शनास आणले होते, असेही शेलार यांनी दाखवून दिले.

मिठागरांच्या जमिनींचा वापर कसा करावा यासाठी नेमलेल्या मंत्रीगटाचा अहवाल येईपर्यंत राज्य सरकार त्यांचा वापर करू शकत नाही. आपणच एखाद्याला मुद्दाम भिडायला जायचं आणि तुम्ही देत नाही तर मी बघून घेतो असं म्हणायचं, अशा प्रकारची सरकारची कृती आहे, असा टोमणाही शेलार यांनी मारला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख