सचिन वाझे २५ मार्चपर्यंत राहणार एनआयएच्या कोठडीत - Sachin Wazena in NIA custody | Politics Marathi News - Sarkarnama

सचिन वाझे २५ मार्चपर्यंत राहणार एनआयएच्या कोठडीत

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 14 मार्च 2021

सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली होती.

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या "अँटिलिया' निवासस्थानासमोर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली होती. तत्पूर्वी सुमारे 12 तासांहून अधिक काळ त्यांची चौकशी करण्यात आली होती. अटक केल्यानंतर त्यांना आज रविवारी (ता.१४ मार्च) एनआयए न्यायालयात दुपारी हजर केले असता त्यांना न्यायालयाने २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावली. 

वाझेंच्या व्हॉट्‌सऍप स्टेट्‌सने खळबळ

सचिन वाझे यांनी शनिवारी खळबळजनक व्हॉट्‌सऍप स्टेटस ठेवले होते. त्यात त्यांनी जग सोडण्याची भाषा केली होती. 3 मार्च 2004 ला सीआयडीतील माझ्या सहकारी अधिकाऱ्यांनी मला खोट्या प्रकरणात अटक केली होती. ती केस अजूनही अनिर्णित आहे. मात्र आता पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. माझे सहकारी अधिकारी आता पुन्हा मला चुकीच्या पद्धतीने गोवण्यासाठी सापळा रचत आहेत. तेव्हाच्या घटनेत आणि आताच्या घटनेत थोडा फरक आहे. त्यावेळी माझ्याकडे संयम, आशा, आयुष्य आणि सेवेची 17 वर्षे होती. आता मात्र माझ्याकडे ना आयुष्याची 17 वर्षे आहेत ना सेवेची. ना जगण्याची आशा. जगाचा निरोप घेण्याची वेळ आता जवळ आली, असे वाझे यांनी व्हॉट्‌सऍप स्टेटसमध्ये म्हटले होते.

यशवंत सिन्हांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला अन् त्यांचे पुत्र जयंत म्हणाले...
 

अंबानी यांच्या मुंबईतील "अँटिलिया' निवासस्थानाजवळ पार्क केलेल्या कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. अंबानी यांना संदेशाद्वारे धमकीही देण्यात आली होती. कारमधील स्फोटक प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. वाझे या प्रकरणात तपास करत होते. त्यामुळे त्यांना याप्रकरणी चौकशीसाठी आज बोलावण्यात आले. सकाळी 11च्या सुमारास वाझे एनआयए कार्यालयात दाखल झाले.

अंबानी स्फोटक प्रकरणातील तपास पथकातील गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन अलकनुरे व श्रीपाद काळे हेही एनआयए कार्यालयात दाखल झाले होते. एनआयएच्या पथकाने तपासासह मनसुख हिरेन यांच्यासोबतच्या संबंधांबाबत चौकशी केली. कारबाबतची माहितीही घेतली. साडेनऊच्या सुमारास इतर तपास अधिकारी, सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन अलकनुसरे व श्रीपाद काळे एनआयए कार्यालयातून बाहेर पडले. तिघांची वेगवेगळी चौकशी करण्यात आली. काळे व अलकनुरे यांच्या चौकशीची गरज भासल्यास त्यांना पुन्हा बोलवण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, चौकशीनंतर अखेर रात्री उशीरा वाझे यांना अटक करण्यात आली.

देवेंद्र फडणवीसांवर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी 
 

स्फोटकांप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाकडून तपास सुरू होता. त्या पथकामध्ये सचिन वाझे यांचाही समावेश होता. दरम्यान, मनसुख यांचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याने घटनेला गंभीर वळण लागले. मनसुख यांच्या पत्नीने वाझे हेच पतीच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे त्याचा तपास एटीएसने करण्यास सुरुवात केली असून, त्यांनी वाझे यांचा जबाबही नोंदवला. स्फोटकांबाबत एनआयएने केलेल्या तपासात अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा झाल्याने, त्यांनी वाझे यांना चौकशीसाठी बोलावले. वाझे यांनी यापूर्वीच ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख