अटकपूर्व जामिनासाठी सचिन वाझेंची न्यायालयात धाव.. - Sachin Waze runs to court for pre-arrest bail Mansukh Hiren | Politics Marathi News - Sarkarnama

अटकपूर्व जामिनासाठी सचिन वाझेंची न्यायालयात धाव..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 13 मार्च 2021

सचिन वाझे यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.

मुंबई : वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी अटकेच्या भीतीने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. मनसुख हिरेन यांची पत्नी विमला हिरेन यांनी दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) दिलेल्या तक्रारीत सचिन वाझे यांच्याविरोधात आरोप केल्यानंतर शुक्रवारी वाझे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. सत्र न्यायालयात हा अर्ज करण्यात आला आहे. त्याची पुढील सुनावणी 18 मार्चला होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्या सुनावणीच्या आधी न्यायालय एटीएसकडून याप्रकरणाची माहिती घेण्याची शक्यता आहे.

सचिन वाझे यांची मुंबई क्राईम ब्रँचमधून नागरी सुविधा केंद्रात काल बदली करण्यात आली आहे. मनसुख हिरेन प्रकरणात एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. वाझे यांची बदली करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधीमंडळात केली होती. 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जी जिलेटिन भरलेली गाडी सापडली त्याबद्दलचा तपास केंद्रीय गृहखात्याने कालच राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपविला. हिरेन यांच्या ताब्यातील ही गाडीच अंबानी यांच्या घरासमोर होती. त्यानंतरच हिरेन यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत सापडला. अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांचा तपास सुरवातील सचिन वाझे यांच्याकडे होता. त्यामुळे हिरेन आणि वाझे यांचे संभाषण झालेले होते. त्यानंतरच वाझे यांचे नाव गेले काही दिवस चर्चेत होते. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमकपणे थेट वाझे यांच्या अटकेची मागणी केली होती. हिरेन यांच्या पत्नीनेही वाझेंनी आपल्या पतीचा खून केल्याचा आरोप केला आहे. 

सचिन वाझे याच्यासारख्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला सरकार इतके का घाबरते असा प्रश्‍न भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केला. या सरकारचे असे नेमके काय गुपीत त्याच्याकडे आहे जे सरकारला त्रासदायक आहे, असे पाटील यांनी म्हटले आहे.

सचिन वाझे यांची बदली का केली? त्यावर अजित पवार म्हणाले की, सचिन वाझे यांची बदली केल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. सभागृहाचे कामकाज व्यवस्थीत चालवे म्हणून त्यांची बदली केली गेली. गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्या नंतर तो निर्णय घेण्यात आला. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख