वाझेंचे 'बॉस' हे वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि पुढारी...बोरवणकरांचा आरोप...

वाझेंना १६ वर्षानंतर पुन्हा पोलिस सेवेत घ्यायला नको होते, असे परखड मत मीरा बोरवणकर त्यांनी व्यक्त केले आहे.
mira26.jpg
mira26.jpg

पिंपरी : सध्या प्रचंड गाजत असलेल्या सचिन वाझे प्रकरणात वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि राजकारणीही असल्याची खात्री असल्याने त्याचा हा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली होण्याची गरज राज्याच्या माजी पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी व्यक्त केली आहे. "एपीआय सचिन वाझेंना १६  वर्षानंतर पुन्हा पोलिस सेवेत घ्यायला नको होते," असे सांगत 'हा चुकीचा निर्णय म्हणजे धोक्याचा लाल बावटा आहे,' असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. 

सध्या राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. तर, केंद्रात त्यांचा विरोधी पक्ष भाजप सत्तेत आहे. यामुळे या दोघांत मोठे मतभेद आहेत. वाझे प्रकरणाचा (उद्योगपती मुकेश अंबानींच्या निवासस्थानाजवळ ठेवलेली स्फोटके आणि मुंब्रा खाडीतील हिरेन मनसुखचा संशयास्पद मृत्यू) तपास करणारी एनआयए केंद्राला रिपोर्ट करीत असल्याने या प्रकरणी न्यायालयाच्या देखरेखीखालीच तपास होण्याची आवश्यकता पुणे व मुंबईत पोलिस आयुक्त, मुंबई पोलिसांच्या गु्न्हे शाखेच्या सहआयुक्त, सीआय़डी आणि सीबीआयमध्येही काम केलेल्या बोरवणकर यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला काल (ता. २५) दिलेल्या मुलाखतीत प्रतिपादित केली. वाझेंचे बॉस हे वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि पुढारी असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. 

वाझे हा थेट पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनाच रिपोर्ट करीत असल्याबद्दल त्यांनी मोठे आश्चर्य व्यक्त केले. आयुक्त व वाझे यांच्यामध्ये ज्येष्ठ निरीक्षक (सिनिअर पीआय), सहाय्यक आय़ुक्त (एसीपी), उपायुक्त (डीसीपी), अतिरिक्त आयुक्त (अॅडिशनल सीपी) आणि सहआयुक्त (जॉईंटसीपी) असे एक नाही, तर अनेक वरिष्ठ (इमिजिअट बॉस) असताना ते थेट सीपींशी का बोलत होते, त्यांनाच का माहिती देत होते याबद्दल आश्चर्य वर्तवित या प्रकरणात अप्रत्यक्ष परमबीरसिंह हे ही सहभागी असल्याचे संकेतच त्यांनी दिले आहेत. 

परभणीचा सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुण ख्वाजा युनूस याच्या पोलिस कोठडीतील मृत्यूप्रकरणी २००४ ला निलंबित केलेल्या वाझेला २०२० ला पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय अनप्रोफेशनल असल्याचे सांगत त्यांनी त्याचे खापर वाझेला पुन्हा सेवेत घेणारे परमबीरसिंह यांच्यावरच फोडले. २००२ च्या घाटकोपर, मुंबई येथील बेस्ट बसमधील बॉम्ब स्फोट प्रकरणी त्यावेळी गुन्हा शाखेत असलेल्या वाझे व टीमने ख्वाजाला संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. कबुलीजबाबासाठी त्याचा अन्वनित छळ केल्याने पोलिस कोठडीतच त्याचा मृत्यू झाला. पण, नंतर त्याला तपासासाठी औरंगाबादला नेत असताना नगर येथे पोलिसांच्या गाडीला अपघात झाल्याने तो पळून गेल्याचा बनाव पोलिसांनी रचला होता. तो नंतर उघडकीस आला. त्यामुळे वाझेसह ११ पोलिसांना निलंबित करून अटक करण्यात आली होती.

अंबानींच्या बंगल्याजवळ स्फोटके ठेवलेल्या स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेनला या कटकारस्थानाचा पूर्ण सुगावा लागल्याने तो उघड होऊ नये, म्हणून त्याचा काटा काढण्यात आला असावा, अशी शंका बोरवणकरांना वाटते आहे. पोलिस खात्यातील भ्रष्टाचाराची साखळी ही चौकातील वाहतूक पोलिसापर्यंत मर्यादित नसून ती थेट वरपर्यंत असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस ठाण्यात सहजासहजी गुन्हा (एफआयआर) नोंदवणं शक्य नसल्याचे सांगत भ्रष्टाचाराची सुरवात तेथूनच होत असल्याचे अप्रत्यक्ष सूचित केले. राजकारणी, नेते हे पोलिस यंत्रणेचा गैरवापर करीत आहेत, असे बोलण्याचे धाडस त्यांनी केले. सर्वच राजकीय पक्ष पोलिस मनुष्यबळाचा शोषण करतात, हे त्यांनी खेदाने नमूद केले. पोलिस संरक्षणात बाहेर पडणे हे प्रतिष्ठेचे झाले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधत पोलिसांचा गैरवापर व शोषण कसे होत आहे, याचे उदाहरण दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com