फडणवीस दोन आरोपींना पाठिशी घालत आहेत..काँग्रेसचा आरोप... - sachin vaze case cdr devendra fadnavis sachin sawant congress  | Politics Marathi News - Sarkarnama

फडणवीस दोन आरोपींना पाठिशी घालत आहेत..काँग्रेसचा आरोप...

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 मार्च 2021

'फडणवीसांनी या गुन्ह्यात सहभागी होऊ नये,' असा सल्ला सावंत यांनी त्यांना दिला आहे.  

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरोसमोरील स्फोटकांचे प्रकरण व मनसुख हिरेन प्रकरणातील महत्वाचा पुरावा असलेला CDR हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, असे त्यांनीच विधानसभेत जाहीरपणे सांगितलेले आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात फडणवीस यांनी सीडीआर दाखवत पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याचबरोबर मनसुख हिरेन यांच्या पत्नीच्या जबाबाचा हवाला देत वाझे यांनी हिरेन यांची हत्या केली असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. 

फडणवीस यांच्या या विधानावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी निशाणा साधला आहे. फडणवीस यांनी मिळविलेल्या सीडीआरवर सावंत यांनी आक्षेप घेत फडणवीसांवर आरोप केला आहे. 'फडणवीस हे दोन आरोपींना पाठिशी घातल आहेत,' असे टि्वट सावंत यांनी केलं आहे. 'फडणवीसांनी या गुन्ह्यात सहभागी होऊ नये,' असा सल्ला सावंत यांनी फडणवीसांना दिला आहे.  
 

सावंत यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे की, कर्नाटक उच्च न्यायालयाच्या 15 मार्चच्या निर्णयाने आरोपीची खाजगी माहिती ३ ऱ्या व्यक्तीला देणाऱ्या अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येईल. देवेद्रजींना मिळालेल्या CDR चा स्त्रोत न सांगून व CDR स्वतः कडे ठेवून ते २ आरोपींना पाठीशी घालत आहेत‌. त्यांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये विनंती.

भाजपचे खासदार रामस्वरूप शर्मा यांची आत्महत्या

फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री या जबाबदारपदावर काम केलेले आहेत. त्यांनी CDR ची माहिती स्वतःकडे ठेवण्याऐवजी तपास यंत्रणांकडे द्यावी व गुन्हेगारांना शिक्षा करण्यास मदत करावी," असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी काल टि्वट करून केले आहे.

सावंत म्हणाले की, सीडीआर मिळवणे हा गुन्हा आहे, नागरिक म्हणूनही तपास यंत्रणांना स्त्रोत सांगणे फडणवीस यांचे कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असलेले पुरावे तपास यंत्रणांना द्यावेत. जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई झाली पाहिजे, ही काँग्रेसचीही भूमिका आहे. कायदा हा सर्वांसाठी समान आहे. काही दिवसांपूर्वी क्राईम ब्रँचने CDR रॅकेट उघडकीस आणून त्यातील दोषींवर कारवाई केली होती. सामान्य लोकांना एक न्याय आणि फडणविसांना दुसरा न्याय हे योग्य नाही. ते मुख्यमंत्री, गृहमंत्री राहिलेले आहेत, जबाबदार व्यक्ती आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख