शिवरायांचा राजधर्म गोळवलकरांच्या शिष्यांना कळणार नाही : सचिन सावंत  - Sachin Sawant criticizes BJP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

शिवरायांचा राजधर्म गोळवलकरांच्या शिष्यांना कळणार नाही : सचिन सावंत 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यावर काही निर्बंध घालण्यात आले आहेत.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यावर काही निर्बंध घालण्यात आले आहेत. येत्या १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साधेपणाने साजरी केली जावी, असे आवाहन राज्य सरकारच्या वतीने करण्यात आले आहे.

यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून, महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. परिणामी राज्य सरकारकडून शिवजयंती संदर्भात नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यावरुन काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. 

सावंत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की,  "छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना विकणारे, शिवस्मारकात भ्रष्टाचार करणारे, नरेंद्र मोदीजींची तुलना शिवरायांबरोबर करणाऱ्या छिंदम प्रवृत्तीच्या भाजपने महाराजांच्या जयंतीबाबत आम्हाला शिकवण देऊ नये. त्यांनी मोदींचा वाढदिवस साजरा करावा. कोरोनाचा संकटकाळ आहे हे विसरता कामा नये". 

शरद पवारांनी भरवली सुशीलकुमार शिंदेंना द्राक्ष 

"शिवराय हे रयतेचे राजे होते. शिवराय आमचे आदर्श आहेत. आमच्या हृदयात आहेत. रयत संकटात असताना त्यांनी जी भूमिका घेतली असती तीच महाविकास आघाडी सरकार घेत आहे. शिवरायांचा राजधर्म हाच होता. दाढी वाढवून स्वतःची शिवरायांबरोबर तुलना करणाऱ्या गोळवलकरांच्या शिष्यांना तो कळणार नाही''. 

पूजा चव्हाण प्रकरणातील 'ते' मंत्री गायब... पण त्यांची गाडी सापडली
 

राज्य सरकारने शिवजयंती साजरी करण्यासाठी नियमावली जारी केली होती. त्यात काही निर्बंध घालण्यात आले होते. त्यावरुन भाजपाने राज्य सरकारवर टीका केली होती. त्यानंतर राज्य सरकारने नव्याने नियमावली जाहीर केली. आधी फक्त १० जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी दिली होती, पण आता १०० जणांना परवानगी दिली आहे.

भाजपाने काय टीका केली होती.  

'सत्तेसाठी शिवसेनेने अनेकदा काँग्रेस-राष्ट्रवादी पुढे लोटांगण घातले आहे. शिवजयंती साजरी करण्यावर बंधने घालून शिवसेना 'घालीन लोटांगण, वंदीन चरण'चा प्रयोग सादर केला. 'हिंदू समाज सडा हुवा है' असे म्हणणाऱ्या शर्जिल व एल्गार परिषदेच्या कार्यक्रमाला राज्य सरकारकडून पायघड्या अंथरल्या जातात, मात्र छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करायला राज्य सरकार बंधने घालते.

पोवाडे, बाईक रॅली, मिरवणूका यावर आघाडी सरकारने अनेक निर्बंध घातले. दारूची दुकाने, बार सुरु करण्यास परवानगी देताना सरकारने गर्दीचा विचार केला नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात कोरोनाच्या नावाखाली अनेक अडचणी सांगितल्या जात आहेत, अशी टीका भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली होती. त्यावरुन सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख