राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पोहोचलाच नाही? - Rathore's resignation did not reach the Governor | Politics Marathi News - Sarkarnama

राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पोहोचलाच नाही?

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 3 मार्च 2021

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात अडचणीत आलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे शनिवारी (ता. २८ फेब्रुवारी) पदाचा राजीनामा दिला.

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात अडचणीत आलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे शनिवारी (ता. २८ फेब्रुवारी) पदाचा राजीनामा दिला. राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांना दबावामुळे घ्यावा लागला. पण, आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा राज्यपालांकडे मंजुरीसाठी अद्याप पाठवलेलाच नाही. अशी, माहिती राज्यपालांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. यावरुन भाजप आमदार संजय कुटे यांनी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

याचाच अर्थ पूजा चव्हाण प्रकरणावरुन निर्माण झालेल्या तणावावर ही मलमपट्टी आहे का? आजही संजय राठोड टेक्निकली मंत्री आहेत. अशाप्रकारे राजीनामा घेऊन स्वत: कडे राजीनामा ठेवणे फ्लोअर मॅनजमेंटचा भाग आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. 

जयंत पाटलांनी धूर्तपणे केलेले करेक्ट कार्यक्रम 

 

संजय राठोड यांचा राजीनामा घेतला तर तो मातोश्रीवर फ्रेम करून ठेवला आहे का? राजीनामा अजून राज्यपालांकडे का गेला नाही? असा प्रश्न भाजप आमदार संजय कुटे यांनी उपस्थित केला आहे. राजीनामा राज्यपालांकडे न गेल्यामुळे ते अजूनही वनमंत्री आहेत. राजीनामा राज्यपालांकडे कसा पोहचेल आणि पूजा चव्हाणला न्याय कसा मिळेल हे भाजप नक्कीच पाहिल, असेही कुटे म्हणाले. मुख्यमंत्री हा राजीनामा महिनाभर लांबणीवर ठेवतील आणि पुन्हा क्लिनचीट देऊन मंत्रीमंडळात आणतील असे होऊ शकते, असा गंभीर आरोप कुटे यांनी केला आहे. 

शिवभोजन थाळी योजना ही शिवसेनेच्या माध्यमातून चालवली जात आहे. ही योजना महिला बचत गटाला चालवायला दिली पाहिजे. शिवभोजन थाळी आड मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप कुटे यांनी केला. शिवभोजनची चौकशी लावावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

फडणवीस, चंद्रकांतदादा, चित्रा वाघ यांच्यावर पुणे पोलिस गु्न्हा दाखल करणार?
 

दरम्यान, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात राठोड यांच्याकडे संशयाची सुई वळली होती. या प्रकरणावरुन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने रान उठवले होते. राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांच्याकडून जोरदारपणे केली जात होती. राठोडांचा राजीनामा न घेतल्यास अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा भाजपने दिला होता. त्यामुळे राठोड यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला होता.   

Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख