यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना भेटणार रामदास आठवले

हाथरसला जाण्याचा दौरा पुढील आठवड्यात आयोजित करणार असल्याचे आठवले यांनी जाहीर केले.
Ramdas Athavale will meet UP Chief Minister Yogi Adityanath
Ramdas Athavale will meet UP Chief Minister Yogi Adityanath

मुंबई : उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील दलित मुलीवर अमानुष अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी. या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या (ता. 3 ऑक्‍टोबर) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची लखनौ येथे भेट घेणार आहेत. 

हाथरसमधील दलित मुलीवरील सामूहिक अत्याचार आणि हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवून लवकरात लवकर आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षातर्फे आठवले हे आदित्यनाथ यांच्याकडे करणार आहेत. 

सामूहिक अत्याचाराने मृत्युमुखी पडलेल्या दलित मुलीच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यास हाथरस येथे आज (ता. 2 ऑक्‍टोबर) आठवले जाणार होते. मात्र, हाथरस जिल्हा प्रशासनाने विनंती केल्यामुळे हाथरसला जाण्याचा दौरा पुढील आठवड्यात आयोजित करणार असल्याचे आठवले यांनी जाहीर केले. 

हाथरसमध्ये जाण्यास कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना प्रशासनाने विरोध केल्यामुळे कॉंग्रेसने देशात मोठे आंदोलन केले होते. मात्र, तसे आंदोलन कॉंग्रेसने हाथरसमधील बळी गेलेल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ करायला पाहिजे होते, असे मत आठवले यांनी व्यक्त केले. 


हेही वाचा : योगींना 50 लाख देतो, त्यांनी खुर्ची सोडावी : पीडित मुलीच्या काकाची संतप्त प्रतिक्रिया 


उल्हास नगर ः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 50 लाख रुपये देतो, त्यांनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडावी. त्यांच्यावर आमचा विश्वास नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया हाथसर येथील सामूहिक बलात्कार पीडित मुलीच्या मोठ्या काकांनी दिली आहे. 

उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने पीडित कुटुंबाला 25 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, त्यावर त्यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. उल्हासनगर शहरात राहणारे पीडितेचे मोठे काका, चुलत भाऊ यांनी अखिल भारतीय नवयुवक वाल्मिकी संघाच्या वतीने उल्हास नगर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्या वेळी त्यांनी आपला संताप व्यक्त केला. 

आमच्या मुलींवर बलात्कार करून हत्या केली, तिला अग्नी देण्याचा अधिकार पण पोलिसांनी हिरावून घेतला. त्या पोलिसांना आरोपी करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. या शिवाय हे दुष्कर्म करणाऱ्या आरोपींना फाशी द्यावी अशीही मागणी त्यांनी केली आहे. या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. 

या वेळी उत्तर प्रदेश पोलिस मुर्दाबादच्या घोषणाही देण्यात आल्या. पीडितेचे काका गेल्या 35 वर्षांपासून आपल्या परिवारासह उल्हासनगर शहरात राहतात. हाथसरला जाण्यासाठी तिकीट न मिळाल्याने ते गावी जाऊ शकले नाहीत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com