डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचे रामदास आठवलेंना दुःख  - Ramdas Athavale mourns Donald Trump's defeat | Politics Marathi News - Sarkarnama

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचे रामदास आठवलेंना दुःख 

सरकारनामा ब्यूरो 
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प विजयी व्हायला पाहिजे होते.

मुंबई : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प विजयी व्हायला पाहिजे होते. मात्र, या अटीतटीच्या निवडणुकीत जो बायडेन विजयी झाले. त्यांचे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने स्वागत करतो. लोकशाहीचा कौल मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वीकारला पाहिजे, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. 

दरम्यान, अमेरिकेची पहिली महिला उपाध्यक्ष म्हणून ऐतिहासिक विजय मिळविलेल्या कमला हॅरिस यांचेही आठवले यांनी अभिनंदन केले. 

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांच्या नेतृत्वात अमेरिका आणि भारत दोन्ही राष्ट्रांचे संबंध अधिक दृढ होतील. अमेरिकेच्या सहकार्याने भारताची अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल, असा विश्वास राज्यमंत्री आठवले यांनी व्यक्त केला. 

अमेरिकेतील स्थायिक भारतीयांना न्याय देण्याचे काम अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपाध्यक्षा कमला हॅरिस करतील, अशी अपेक्षा रामदास आठवले यांनी पत्रकातून व्यक्त केली आहे. 

हेही वाचा : आठवले घरी येताच रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करीत धरला ठेका ! 

कोरोनाचा संसर्ग झाल्याने रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले गेल्या काही दिवसापासून एका खासगी रुग्णालयात होते. त्यांना रविवारी (ता. 8 नोव्हेंबर) घरी सोडण्यात आल्यांनतर त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त ठेका धरला. त्यांच्या मुंबईतील निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 

त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना मुंबईतल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अभिनेत्री पायल घोष हिने रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला होता. या कार्यक्रमाला अनेक जण उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर आठवले यांना खोकला व अंगदुखीची लक्षणे जाणवायला लागली. 

त्यांनी कोरोनाची चाचणी केल्यानंतर ते पॉझिटिव्ह निघाले होते. त्यांच्याप्रमाणेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनाही कोरोना झाला होता. त्यांच्या पाठोपाठ आता खासदार सुनील तटकरे व त्यानंतर आठवले यांना कोरोनाची लागण झाली होती. 

आठवले यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्यानंतर आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करीत त्यांच्या निवास स्थानासमोरच ठेका धरला. ढोलताशाच्या गजरात काही महिलांसह कार्यकर्त्यांनी नृत्य केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख