राजेश टोपे यांनी दुसरी लस घेतली... मात्र, किती दिवसांनी...? - Rajesh Tope took the second dose of Corona vaccine | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

राजेश टोपे यांनी दुसरी लस घेतली... मात्र, किती दिवसांनी...?

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 18 मे 2021

आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे  यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. त्यावरुन सोशल मीडियावर वाद सुरु झाला आहे.

मुंबई : देशात कोरोनालसीच्या (Vaccination) पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील अंतर किती असावे, हे केंद्र सरकारने ठरवले आहे. त्यानुसार कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस 12 ते १६ आठवड्यांनी दिला जातो, तर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस ४ ते ६ आठवड्यांनी दिला जातो. (Rajesh Tope took the second dose of Corona vaccine)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या तशा गाईडलाईन्स आहेत. कोविन पोर्टलवर हे दिवस पूर्ण झाल्याशिवाय नोंदणीच होत नाही. आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. त्यावरुन सोशल मीडियावर वाद सुरु झाला आहे. अनेक जणांनी प्रश्न केला आहे की टोपे यांनी ३० दिवसांतच लस कशी घेतली. सामान्य नागरिकांना पहिलाही डोस मिळत नाही आणि टोपे यांनी ३० दिवसात दुसरा डोस कसा घेतला, असे सवाल नेटकरी विचारु लागले आहेत.

हे ही वाचा : गंगेत मृतदेह ; मानवाधिकार आयोगाच्या नोटिशीनंतर मुख्यमंत्री योगींना साक्षात्कार

टोपे यांनी लसीचा पहिला डोस १९ एप्रिल रोजी घेतला होता. त्यानंतर त्यांनी आज म्हणजेच १८ मे रोजी दुसरा डोस घेतला आहे. ही माहिती त्यांनी स्वत: ट्वीट करत दिली आहे. मात्र, त्यांनी नेमकी कोणती लस घेतली याची माहिती दिलेली नाही. सध्या देशभरात कोविशिल्डसह कोव्हॅक्सिनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना ठराविक अंतरात डोस देणे गरजेचे असल्याने बहुतेक राज्यांनी दुसऱ्या डोससाठी प्राधान्य दिले जात आहे. तर काही राज्यांनी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची लसीकरण थांबवले आहे.

भारतात जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलिस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. 

हे ही वाचा : दोन जादा आमदारांच्या जीवावर उड्या मारु नका..''राष्ट्रवादीचा शिवसेनेला इशारा...

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली गेली. तिसऱ्या टप्प्यात 45 वर्षांवरील सर्व रुग्णांना लस देण्यास सुरवात झाली. आता चौथ्या टप्प्यात 18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येत आहे. मात्र, सध्या देशात लसीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. लस उपलब्ध नसल्यामुळे देशातील अनेक लसीकरण केंद्र बंद पडले आहेत. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ. रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.

Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख