राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा लिहिले पत्र...   

जवळजवळ मुंबईतील सर्व कार्यालये सुरू आहेत. सगळ्यांनाच घरून काम करता येणे शक्य नाही.
 Raj Thackeray, Chief Minister Uddhav Thackeray .jpg
Raj Thackeray, Chief Minister Uddhav Thackeray .jpg

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून, रुग्णसंख्येतही घट होताना दिसत आहे. त्यामुळे हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. नागरिक कामानिमित्ताने घराबाहेर पडू लागलेत. नागरिकांना मुंबईत प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. लॅाकडाऊनच्या काळात राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासावर बंदी घातली होती. मात्र, आता लोकल पुन्हा सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याची मागणी होत आहे. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले आहे. सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवास करू देण्यासंदर्भात तातडीने पावले उचलण्याची मागणी राज ठाकरे यांनी सरकारकडे केली आहे. (Raj Thackeray wrote a letter to Chief Minister Uddhav Thackeray) 
 
राज ठाकरे म्हणाले, मुंबईकरांचे रोजचे हाल थांबवण्यासाठी मुंबईची लोकल सेवा निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, अशा सर्वांसाठी अत्यंत तातडीने सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात राज ठाकरे म्हणाले, गेल्या १५ महिन्यांपासून देशाप्रमाणे महाराष्ट्रात अनेक प्रकारचे निर्बंध सरकारने लागू केले आहेत. निर्बंध आपण सर्वच जण पाळत आलो आहोत. आजकाल हे निर्बंध नक्की कोणासाठी असा प्रश्न पडू लागला आहे. त्यातल्या त्यात मुंबई शहरासाठी जे निर्णय घेतले जात आहेत, ते तर अनाकलनीय आहे.

जवळजवळ मुंबईतील सर्व कार्यालये सुरू आहेत. सगळ्यांनाच घरून काम करता येणे शक्य नाही. त्यांना रोज अनेक तास प्रवास करावा लागतो आहे. लोकल बंद असल्यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत. राज्य सरकारने बस सेवेला परवानगी दिली; मात्र, लोकल बंद असल्याने या बसमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. गर्दीत प्रवास केल्याने रोगही अधिक पसरण्याचाच धोका आहे. त्यामुळे बस सुरू आणि लोकल बंद याने नेमके काय साध्य होणार, असा सवाल त्यांनी केला आहे. 

साथ एकाएकी जाणार नाही, असे जगातल्या तज्ञाचे मत आहे. आपल्याला अशा साथीबरोबरच राहण्याची सवय करून घेण्याची गरज आहे. योग्य निर्णय, उपाययोजना आपल्याला करायला हव्यात. लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे आहे, परंतु त्यासोबतच धोरण आखणीमध्ये अधिक कल्पकता दाखवायला हवी. पण दिसतेय असे की राज्य सरकारला अजूनही टाळेबंदी आणि निर्बंधांच्या पलिकडे काही सुचत नाही, असेही ते म्हणाले. 

मुंबईची लोकल सेवा आणि निर्बंध शिथिल करण्यासाठी सरकारने आता तातडीने पावले उचलावीत. सर्वसामान्य माणसाने आत्तापर्यंत खूप सहन केले त्याची सहन करण्याची क्षमता आता संपत चालली. त्यामुळे आता यापुढे सरकारकडून काही सकारात्मक उपाय केले गेले नाही, तर कडेलोट होईल. त्या परिस्थितीत माझा पक्ष मुंबईकरांसोबत तर उभा राहिल, परंतु लोकल प्रवास तातडीने सुरू करण्यासाठी आंदोलन सुरू करेल, असा ईशारा राज यांनी दिला आहे. 

त्यामुळे मी माझ्या पक्षातर्फे मुख्यमंत्र्यांना अशी मागणी करत आहे की, मुंबईकरांचे हाल थांबवण्यासाठी मुंबईची लोकल सेवा, निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, अशा सर्वांसाठी तरी लोकल सुरु करावी जेणेकरुन मुंबईचे अर्थचक्र पुन्हा सुरळीत सुरू होईल. मला अपेक्षा आहे की, राज्य सरकार या सगळ्याचा विचार करून त्वरित पावले उचलेल, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. 

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com