राज ठाकरे मास्क वापरत नाहीत यावर संजय राऊत म्हणाले...

कोरोनाशी लढण्यासाठी मास्क हीच खरी लस आहे. राज्याचे मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान वारंवार हेच सांगत आहे
 Sanjay Raut, Raj Thackeray .jpg
Sanjay Raut, Raj Thackeray .jpg

मुंबई : कोरोनाशी लढण्यासाठी मास्क हीच खरी लस आहे. राज्याचे मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान वारंवार हेच सांगत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मास्क का वापरायचा नाही, याचे एकदा ठोस कारण सांगावे, असे आवाहन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना केले आहे. 

राज ठाकरे विनामास्क प्रवास करतात, हे अनेकदा समोर आले. आजही त्यांनी नाशिक दौऱ्यात मास्क लावलेले नव्हते. तसेच नाशिकचे माजी महापौर मुर्तडक यांनाही राज ठाकरे यांनी चेहऱ्यावरील मास्क काढण्याची सूचना केली. त्यामुळे राज ठाकरेंचा 'विना मास्क इशारा' चर्चिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरेंनी मास्क न घातल्यामुळे टोलेबाजी केली. 

पंतप्रधान, मुख्यमंत्री कोरोना काळात मार्गदर्शन करत आहेत. त्याचे पालन करणे आवश्यक आहे. सर सलामत तो पगडी पचास तसे आधी जीव महत्वाचा आहे. रुग्णालयात गेल्यावर जे भोगावे लागते ना. तेव्हा वाटते ऐकायला हवे होते. मास्क घालायला हवे होते. मग आधीच ऐका ना, असा सल्ला संजय राऊत यांनी राज यांना दिला. 

यावेळी राऊत म्हणाले, राज ठाकरेंबद्दल काय बोलणार. ते मनसेचे नेते आहेत. पण, मास्क का वापरत नाहीत याचे त्यांनी ठोस विश्लेषण करणे गरजेचे आहे. वैद्यकीय कारण काय आहे?, हे त्यांनी सांगितले पाहिजे. ते जाणकार आहेत. लोकांचे नेते आहेत. त्यांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे, मास्क का वापरू नये? मुख्यमंत्री, पंतप्रधान म्हणतात मास्क वापरा. तसे ठाकरेंनी मास्क का वापरु नेय हे पटवून दिले पाहिजे.  मास्क न वापरणे लोकांसाठी धोका आहे. काल गुरुवार (ता.४ मार्च) अजित पवार यांनीही सांगितले. ते स्वतः या संकटातून गेले आहेत. मास्क वापरणे किती गरजेचे आहे हे ज्यांना कोरोना झाला किंवा होऊन गेला त्यांना ठाऊक आहे. 

मुख्यमंत्र्याचा आरोग्य विषयावर चांगला अभ्यास आहे. या विषयांवर त्यांना बरेच कळते. जागतिक आरोग्य संघटनेने काही मापदंड घालून दिले आहेत. देशाचे पंतप्रधान, विविध मंत्री, मुख्यमंत्री कोरोना काळात मार्गदर्शन करत आहेत. मास्क हीच खरी लस आहे आणि त्यात तथ्य देखील आहे, असेही राऊत यांनी सांगितले.  

मास्क घातला नाही तर बऱ्याच ठिकाणी कारवाई होते. दिल्लीत मी स्वतः माझ्यावर कारवाई झाली आहे. मी दंड भरला आहे. माझ्यासह अनेक खासदारांनीही दंड भरला. एकदा गाडीतून विमानतळावर जात असताना फोनवर बोलण्यासाठी मास्क थोडा खाली केला. पण, पोलिस पथकाने ते बरोबर हेरले. माझी गाडी बाजूला घेतली. माझे सहकारी त्यांना म्हणाले, खासदार आहेत. त्यावर पोलिसांचे उत्तर बाणेदार होते, ते मला खूप आवडले. खासदार असले म्हणून काय झाले? मास्क वापरणे आवश्यक आहे आणि खासदार कायदा तयार करणारी मंडळी आहेत. कायद्यानुसार आम्ही कारवाई करतो. मी ताबडतोब दंड भरला कारण मी नियम मोडला होता, असेही राऊत यांनी सांगितले 

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com